वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू
By संतोष हिरेमठ | Updated: January 19, 2024 15:40 IST2024-01-19T15:35:17+5:302024-01-19T15:40:01+5:30
मराठवाड्यातील रस्त्यांवर रोज ७ जणांचा बळी

वाहन सांभाळून चालवा! राज्यात वर्षभरात ३० हजारांवर अपघातांत १३ हजारांवर मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : राज्यात रस्ते अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे. राज्यात अवघ्या ११ महिन्यांत ३० हजारांवर अपघात झाले असून, त्यात १३ हजारांवर लोकांचा मृत्यू झाला. मराठवाड्यातील रस्त्यांवरही दररोज जवळपास ७ लोकांचा रस्ते अपघातात बळी जात आहे. अपघात आणि मृत्यूची संख्या पाहता वाहन चालविताना काळजी घेण्याची गरज आहे. तर शासनानेही अपघात प्रणवस्थळांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
राज्यात सर्वत्र रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांतील अपघातांची तुलना करणारी २०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षांची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी पाहता २०२१ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघात आणि अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. राज्यात २०२१ मध्ये २६ हजार ५३५ अपघात, १२ हजार १७० मृत्यू झाले. तर २०२३ मध्ये ३० हजार ८५७ अपघात आणि १३ हजार ५७९ मृत्यू झाले.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागातील अपघात
वर्ष- अपघात- एकूण मृत्यू
२०२१-५४०-३६५
२०२२-६७५-४२८
२०२३-७२५-४३५
छत्रपती संभाजीनगर शहरातील अपघात
वर्ष- अपघात- एकूण मृत्यू
२०२१- ४२७-१४३
२०२२- ४७१-१८६
२०२३- ५६८-१८७
मराठवाड्यात २०२३ मध्ये किती अपघात ?
जिल्हा- अपघात- एकूण मृत्यू
परभणी-३९६-१९८
लातूर- ७३१-३३९
हिंगोली-३३७-१९०
नांदेड-६३३-३४०
बीड-७४०-४१५
धाराशिव- ५९७-२६८
जालना-५२८-३०५
राज्यातील स्थिती (२०२३)
ठिकाण- अपघात- एकूण मृत्यू
पुणे ग्रामीण-१७००-९६३
मुंबई शहर - १२६३-२५२
नवी मुंबई - ६९५-२१७
नागपूर ग्रामीण -८४५-३६७
नागपूर शहर-११०३-२७७
पुणे शहर-११३२-३१६
पिंपरी चिंचवड-१०९७-३३४
नंदूरबार-२९१-१८४
सातारा-८८४-४५१
नाशिक शहर-४२६-१७१
सोलापूर ग्रामीण-१११३-६११
सोलापूर शहर- १७४-६९
कोल्हापूर-१०६६-३७६
नाशिक शहर-४२६-१७१
जळगाव-८१७-४३२
अपघाताची काही कारणे
- खराब रस्ता, धोकादायक वळण.
- गुळगुळीत रस्त्यांवर वाहनांचा अतिवेग.
- मद्यपान करून वाहन चालविणे.
- वाहन चालविताना डुलकी लागणे.
- नादुरुस्त वाहन चालविणे.
- अनेक ठिकाणी तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लावणे कठीण.
- दुचाकीचालकांची राष्ट्रीय महामार्गांवर वाढती संख्या.
हेल्मेट, सीटबेल्ट वापरा
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात काही प्रमाणात अपघात वाढले आहे. हे अपघात कमी करण्यासाठी विविध प्रयत्न आणि उपाययोजना केल्या जात आहेत. वाहनचालकांनी हेल्मेट, सीटबेल्टचा वापर करावा. मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)