ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:24 IST2025-02-04T16:22:36+5:302025-02-04T16:24:19+5:30

बाजारात मोठ्या प्रमाणात आवक, व्हिएतनामहून मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट भारतात आयात केले जाते. त्यामुळे त्याचा दर तुलनेने जास्त असतो.

Dragon Fruit-Super Fruit; Does it really increase white blood cells? | ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का?

ड्रॅगन फ्रूट-सुपर फ्रूट; खरेच पांढऱ्या पेशी वाढविते का?

छत्रपती संभाजीनगर : उष्णकटिबंधीय ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळाची लागवड कर्नाटक, आंध्र, तेलंगणापाठोपाठ महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात होत आहे. डेंग्यू, मलेरिया, काविळीसारख्या विषाणूजन्य आजारांत पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी या फळाची अनेकांकडून शिफारस केली जात आहे.

काही आजारांमध्ये संसर्ग झाल्यानंतर, तसेच अधिकचा ताण तणाव असल्याने देखील पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात. त्या भरून काढण्यासाठी मॅग्नेशियम नावाचा घटक मदत करतो आणि हे मॅग्नेशियम ड्रॅगन फ्रूटमध्ये भरभरून असल्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी वाढतात आणि आजार लवकर कमी होतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

व्हिएतनामच्या फळाचा दर जास्त
व्हिएतनामहून मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रूट भारतात आयात केले जाते. त्यामुळे त्याचा दर तुलनेने जास्त असतो. आयातीत खर्च अधिक असल्याने बाजारात या फळाची किंमत वाढलेली दिसते.

लोकल फळाचे दर कमी
महाराष्ट्रात उत्पादित ड्रॅगन फ्रूट तुलनेत स्वस्त आहे. स्थानिक हवामानाशी जुळवून घेतल्यामुळे त्याची गुणवत्ता सुधारली असून, ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ते उपलब्ध होऊ लागले आहे.

कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन-८ ने युक्त
हे फळ कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन-बीच्या समृद्ध स्रोतांपैकी एक आहे. त्यामुळे हाडांचे आरोग्य, पचनक्रिया आणि शरीरातील विविध चयापचय क्रियांना मदत करणारे मानले जाते.

ड्रॅगन फ्रूट पांढऱ्या पेशी वाढवते का?
पांढऱ्या पेशींची संख्या वाढविण्यासाठी आहारात अँटीऑक्सिडंटयुक्त आणि पोषणमूल्यांनी समृद्ध पदार्थांचा समावेश आवश्यक असतो. काही अभ्यासांनुसार ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले पोषक घटक प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करतात. मात्र, पांढऱ्या पेशी वाढवण्यास हे थेट कारणीभूत ठरते का, यावर अधिक संशोधनाची गरज आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

डेंग्यू, कावीळ, मलेरियात गुणकारी
ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे संसर्गांपासून बचाव होतो. तथापि, हे आजार बरे करण्यासाठी औषध म्हणून काम करते का, याबाबत स्पष्ट वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच हे खावे.

पोषणाच्या दृष्टीने सुपर फ्रूट
ड्रॅगन फ्रूट या एकमेव फळांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असणारे घटक आहे. ज्यामध्ये जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व अ, खनिजांचा समूह ज्यामध्ये लोह, मॅग्नेशियम भरपूर असल्याकारणाने तसेच तंतुमय घटकदेखील अधिक असल्यामुळे हे फळ सगळ्याच दृष्टीने पोषणासाठी सुपर फ्रूट आहे.
- अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

Web Title: Dragon Fruit-Super Fruit; Does it really increase white blood cells?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.