डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:29 IST2025-06-03T17:28:58+5:302025-06-03T17:29:46+5:30
प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत.

डॉ. शिवाजी सुक्रे यांची धुळ्याला बदली, घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार कायम
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांची परभणी येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मूळ प्राध्यापक पदावरून बदली झाली आहे. धुळे येथील शासकीय रुग्णालयात डॉ. सुक्रे यांची बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. मात्र, डॉ. सुक्रे यांच्या कडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा ( घाटी) अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार कायम राहणार आहे.
डॉ. सुक्रे हे परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. डिसेंबर २०२३ पासून त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाचा अधिष्ठातापदाचा कार्यभारही स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात घाटी रुग्णालयात विविध सुधारणांची अंमलबजावणी होत आहे. मात्र, अलीकडेच झालेल्या अभ्यागत समितीच्या बैठकीत त्यांच्या कामकाजावर टीका झाली. खरेदी प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याच्या पार्श्वभूमीवर समितीचे अध्यक्ष प्रदीप जैस्वाल यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. यावर, काही अभ्यागत समिती सदस्यांना कंत्राट न दिल्यामुळे हे आरोप केले जात असल्याचा दावा घाटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
प्राध्यापक म्हणून बदली
डॉ. सुक्रे यांनी छत्रपती संभाजीनगर येथीलच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून, ते येथेच वैद्यकीय अधीक्षक पदापासून अधिष्ठाता पदापर्यंत कार्यरत आहेत. सध्या शरीररचनाशास्त्र विभागातील प्राध्यापक म्हणून परभणी येथून त्यांची धुळे येथे बदली झाली आहे. मात्र, या बदलीनंतरही, ते पुन्हा घाटीतच अधिष्ठाता म्हणून कार्यरत राहणार आहेत.
अधिष्ठाता म्हणून कायम राहणार
मी परभणीला प्राध्यापक शरीररचनाशास्त्र या पदावर कार्यरत होतो. आता ह्याच प्राध्यापक पदावर मला धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदावर दाखवले आहे. मी अधिष्ठाता म्हणून छत्रपती संभाजीनगर येथेच काम करत राहणार आहे.
- शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता