पाणी आणा पाणी; पर्याय सूचवा ना...!; औरंगाबाद मनपामध्ये भाजपच्या मागणीला सेनेचे उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:34 IST2018-01-13T13:30:40+5:302018-01-13T13:34:10+5:30
शहरात उपलब्ध पाणी आणि वाढती गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटते पाणी आणावे. पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला.

पाणी आणा पाणी; पर्याय सूचवा ना...!; औरंगाबाद मनपामध्ये भाजपच्या मागणीला सेनेचे उत्तर
औरंगाबाद : जायकवाडीहून औरंगाबाद शहरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकून पाणी आणण्यात यावे, अशी मागणी दोन दिवसांपूर्वीच भाजपतर्फे करण्यात आली होती. शहरात उपलब्ध पाणी आणि वाढती गरज लक्षात घेऊन प्रत्येकाला वाटते पाणी आणावे. पाणी आणायचे कसे, याचा पर्यायही सुचविण्यात यावा, असा टोला शुक्रवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजपला लगावला. समांतर प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि लवादाकडे प्रलंबित आहे. यातून कोणता मार्ग काढावा हे कोणीच सांगत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
उन्हाळ्यात महापालिकेला पाणीपुरवठ्यात तारेवरची कसरत करावी लागते. दरवर्षी पाण्यावरून धरणे, निदर्शने, मोर्चे निघतात. कधी पाण्याच्या टाकीवर घेराव आंदोलन होते, तर कधी महापौर दालनात ठिय्या आंदोलन होते. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच महापालिकेत समांतरच्या मुद्यावरून राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. दोन दिवसांपूर्वी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनी मुख्य जलवाहिनी टाकून शहरात पाणी आणावे, अशी मागणी केली.
या मागणीला उत्तर देताना शुक्रवारी महापौर घोडेले म्हणाले की, सर्वांना कळतंय की, शहरात पाणी आणले पाहिजे. मुख्य जलवाहिनीचे काम कसे सुरू करणार? प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि लवादाकडे प्रलंबित आहे. शासन महापालिकेला स्वतंत्रपणे जलवाहिनी टाकण्यास मुभाही देत नाही. सव्वातीनशे कोटी रुपये समांतरचे बँकेत पडून आहेत, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. समांतरचे काम करणा-या युटिलिटी कंपनीने सर्वसाधारण सभेत आमची बाजू मांडू द्यावी असा विनंती अर्ज केला होता. हा अर्ज विधि विभागाकडे सल्ला घेण्यासाठी पाठवून दिला. त्यावर अद्याप निर्णय आलेला नाही.
समान पाणी वाटप म्हणजे काय भाऊ...
एमआयएम पक्षाचे नगरसेवक मागील काही दिवसांपासून समान पाणी वाटपाची मागणी करीत आहेत. नेमके समान पाणी वाटप म्हणजे काय, याचा अर्थ तरी सांगावा. मुस्लिमबहुल वसाहतींना कमी आणि हिंदू वसाहतींना जास्त पाणी देण्यात येत आहे, हे सिद्ध करून दाखवावे, असे आवाहनही महापौरांनी केले.गुलमंडी, राजाबाजार, खाराकुंआ आदी वसाहतींनाही पाच ते सहा दिवसांनंतर पाणी मिळत आहे. या भागात तर सेनेचे मोठे नेते राहतात. विनाकारण राजकीय स्टंट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कारागृहातून येताच...
एमआयएमचे दोन नगरसेवक कारागृहातून येताच पाणी प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीने आपली भूमिका मांडत आहेत. एका नगरसेवकाने गुरुवारी स्थायी समितीमध्ये ठिय्या आंदोलन केले. दुसºया एका नगरसेवकाने वॉर्डात दूषित पाणी येत असल्याची तक्रार करीत २६ जानेवारीला मनपासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.