लग्न जमविताना पत्रिकेतील ‘मंगळा’चा बागुलबुवा करू नका: मोहन दाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 17:06 IST2025-01-13T17:05:47+5:302025-01-13T17:06:00+5:30
८० टक्के पत्रिकांत मंगळ असतानाही लग्न जमतात. शास्त्रात त्यावर उपाय दिले आहेत, हे खूप लोकांना माहीत नाहीत.

लग्न जमविताना पत्रिकेतील ‘मंगळा’चा बागुलबुवा करू नका: मोहन दाते
छत्रपती संभाजीनगर : मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत ‘मंगळ’ आहे म्हणून लग्नास सर्रास नकार दिला जातो. कमी अभ्यास असलेल्या ज्योतिषाकडे अशी पत्रिका दाखविली तर तो ‘मंगळा’चा बागुलबुवा करू शकतो. १०० पत्रिकांपैकी २० टक्के पत्रिका मंगळामुळे जमत नाहीत. मात्र, ८० टक्के पत्रिकांत मंगळ असतानाही लग्न जमतात. शास्त्रात त्यावर उपाय दिले आहेत, हे खूप लोकांना माहीत नाहीत. तसेही लग्न जुळविण्याच्या परीक्षेत पत्रिकेचे गुण १० टक्केच असतात, बाकीचे ९० टक्के गुण तुमच्या हातात असतात, यामुळे मंगळाचे अवडंबर माजवू नका, असा सल्ला पंचांगकर्ते मोहन दाते यांनी वधू-वर पालकांना दिला.
काण्व ब्राह्मण समाजाच्या वतीने रविवारी सर्वशाखीय ब्राह्मण वधू-वर परिचय मेळावा घेण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह वधू-वराच्या पालकांनी भरून गेले होते. पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘एआय’च्या जमान्यातही पंचांगांचे महत्त्व अबाधित राहील, असे सांगितले. प्रारंभी, समाजाचे अध्यक्ष सीए लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविक अशोक भाले यांनी केले. सुरेश देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी उदय मानवतकर, धिरज देशपांडे, धनंजय सीमंत, विजयालक्ष्मी कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी, संगीता कागबट्टे आदी पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.
पंचांगकर्ते मोहन दाते काय म्हणाले?
१) एकनाडी दोषाची पत्रिका असेल तरी लग्न जमू शकते.
२) दोघांची एक नाड असली तरी धर्मशास्त्रात त्यावर उपाय दिला आहे.
३) पत्रिकेतील नाडीचा व रक्तगटाचा काही संबंध नाही.
४) रक्तगट व गोत्राचा ‘डीएनए’शी काही संबंध नाही.
५) दोघांचे एक नक्षत्र-एक चरण असले तर लग्न करू नये.
६) नातेसंबंधात लग्न करू नये
७) पोटशाखेत विवाह कराल तर समाज टिकेल.
प्लॅनिंग करू नका...
मोहन दाते म्हणाले, की, विवाहेच्छु प्रौढांची वाढती संख्या हा समाजासमोरील सर्वांत मोठा प्रश्न आहे. मुलींची संख्या घटत आहे. यामुळे लग्नानंतर ’प्लॅनिंग’ करू नका. मी सर्व ज्योतिषांना सांगितले आहे की, नवदाम्पत्यांना तूम्ही आवर्जून सांगा की, तुमचा भाग्योदय दोन संततीनंतर आहे. यामुळे तरी समाजात जन्मदर वाढेल. (हंशा)