- मुजीब देवणीकर
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत समस्यांवर तासन्तास चर्चा होते. पण, यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा, नागरिकांना दिलासा कसा मिळेल, यावर चर्चा व्हावी. भविष्यात अशाच पद्धतीने काम होईल. अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आळस झटकून कामाला लागले पाहिजे. कोणतेही काम करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. नकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कामच होणार नाही. पुढील सहा ते आठ महिन्यात नागरिकांना महापालिकेत सकारात्मक बदल दिसतील, असे समीर राजूरकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रश्न- महापालिकेवर १६०० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे, विकास कसा होईल?राजुरकर- ८२२ कोटींचे कर्ज पाणीपुरवठ्यासाठी तर स्मार्ट सिटीसाठी २५० कोटींचे कर्ज घेतले आहे. याशिवाय ड्रेनेज व अन्य कामांसाठी केंद्र, राज्य शासनाने निधी दिला. महापालिकेला स्वत:चा वाटा टाकावाच लागेल. त्यासाठी अगोदर आपली आर्थिक स्थिती भक्कम असावी. शासन अनेक योजनांसाठी निधी द्यायला तयार आहे. पण, आपली झोळी फाटकी असायला नको. महापालिका अगोदर आर्थिकरीत्या सुदृढ कशी होईल, यासाठी ठोस पाऊले उचलण्यात येतील.
प्रश्न- साडेपाच हजार कर्मचारी असूनही कर्मचारी नाहीत, अशी ओरड का?उत्तर- साडेतीन हजारांहून अधिक कायमस्वरूपी अधिकारी, कर्मचारी आहेत. १७०० पेक्षा जास्त कंत्राटी अधिकारी, कर्मचारी आहेत. कामाचे मूल्यमापनच कोणी करीत नाही. कोणाकडे नेमके काम काय? तो दिवसभर करतो काय? हे बघावे. आस्थापना आणि लेखा विभागाची कधी संयुक्त बैठकच झालेली नाही. प्रत्येकाला जबाबदारी आणि काम नीट दिले तर सर्व सुरळीत होईल.
प्रश्न- यंदा उन्हाळ्यात नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल का?उत्तर- २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून चाचणी होईल. २०० एमएलडी अतिरिक्त पाणी आल्यावर नागरिकांना किमान एक दिवसाआड पाणी मिळावे. सध्या ज्या अडचणी आहेत, त्या दूर केल्या जातील.
प्रश्न- महापालिकेत नियमाने कमी आणि नियमबाह्य कामे अधिक होतात...उत्तर- मागे काय झाले, हे बघत बसण्यापेक्षा पुढे काय आणि कसे चांगले करता येईल, यावर भर देणारा मी कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शहराचा सर्वांगीण विकास होईल. यापुढे सर्व कामे नियमानेच होतील.
प्रश्न- शहर १९८० च्या दशकासारखी प्रगती पुन्हा गरुडझेप घेईल का?उत्तर- शहरात मोठमोठे उद्योग येताहेत. उद्योगांना पोषक वातावरण तयार करू. पायाभूत सुविधांवर भर देऊ. पाण्याचा प्रश्नही जवळपास सुटला आहे. रस्ते चांगले करण्यासाठी शासनाकडून निधी येईल. शहर पुढील काही वर्षात गरुडझेप घेईल, हे निश्चित.
Web Summary : New Mayor Samir Rajurkar emphasizes problem-solving over dwelling on issues. He aims for efficient governance, financial stability, and improved infrastructure. A new water supply scheme promises better water access. Rajurkar envisions significant progress and development for the city in the coming years with collaborative efforts.
Web Summary : नए महापौर समीर राजूरकर समस्याओं पर ध्यान केंद्रित करने के बजाय समाधान पर जोर देते हैं। उनका लक्ष्य कुशल शासन, वित्तीय स्थिरता और बेहतर बुनियादी ढांचा है। एक नई जल आपूर्ति योजना से बेहतर जल पहुंच का वादा किया गया है। राजूरकर आने वाले वर्षों में शहर के लिए सहयोगात्मक प्रयासों से महत्वपूर्ण प्रगति और विकास की कल्पना करते हैं।