छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या जी.आर. च्या अंमलबजावणीबाबत काही शंका असेल तर चर्चेला या, मात्र संभ्रम निर्माण करू नका, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी रात्री येथे पत्रकारांशी बोलताना केले.
पाच दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती बिघडल्याने मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे दोन दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जरांगे यांना भेटण्यासाठी विखे पाटील रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांनी जरांगे यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेल्या जी.आर.वर काही जण समाजमाध्यमावर टीका करून संभ्रम निर्माण करीत आहेत. इतके दिवस हे लोक कुठं होते, जरांगे मुंबईत उपोषण करीत होते. लाखो मराठा समाज तेथे होता तेव्हा ते माझ्याकडे का आले नाही? मराठा समाजातील अभ्यासकांना विनंती की जी.आर.बाबत काही शंका असेल तर समाजमाध्यमावर व्यक्त होऊ नका, सरकारने तुमच्यासाठी चर्चेची दारे खुली ठेवली आहेत. गणेश विसर्जनानंतर चर्चा करू, असे त्यांनी नमूद केले.
ओबीसींना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचा पुढाकारराज्यातील अठरापगड जातींना ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी मोठा भाऊ म्हणून मराठा समाजानेच पुढाकार घेतला होता. आज ज्यांच्या नोंदी सापडत असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाने सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
वंशावळ शोध समिती आणि प्रमाणपत्र देण्याचा कालबद्ध कार्यक्रम द्या- जरांगे पाटीलहैदराबाद गॅझेटियर प्रमाणे ज्यांच्या नोंदी सापडत आहेत, त्यांचे वंशावळ शोध समिती आणि कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या समितीला कालबद्ध कार्यक्रम द्या, अशी मागणी जरांगे यांनी मंत्री विखे यांच्याकडे केली.