कुत्र्यांनी तोडले ३ वर्षांच्या बालकाचे लचके; दिवसभरात मोकाट श्वानांकडून ७ मुलांना चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 13:08 IST2024-01-05T13:07:46+5:302024-01-05T13:08:03+5:30

शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांमुळे दहशत वाढत आहे.

Dogs bite to 3-year-old boy; 7 children bitten by stray dogs in a day | कुत्र्यांनी तोडले ३ वर्षांच्या बालकाचे लचके; दिवसभरात मोकाट श्वानांकडून ७ मुलांना चावा

कुत्र्यांनी तोडले ३ वर्षांच्या बालकाचे लचके; दिवसभरात मोकाट श्वानांकडून ७ मुलांना चावा

छत्रपती संभाजीनगर : मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने एका ३ वर्षांच्या बालकाचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. संपूर्ण शरीरावर मोकाट कुत्र्यांनी चावा घेत बालकाला गंभीर जखमी केले. या बालकाला गंभीर अवस्थेत उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. यासह गुरुवारी दिवसभरात विविध भागांतील ७ बालकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या.

मोहम्मद अजमत खान (३, रा. संजयनगर), असे मोकाट कुत्र्यांनी संपूर्ण शरीराचे लचके तोडलेल्या बालकाचे नाव आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हबडे यांनी दिली. या चिमुकल्यासह घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वाॅर्ड क्रमांक २५ मध्ये दिवसभरात श्वानदंश केलेल्या ७ बालकांवर उपचार करण्यात आले. हे सर्व बालक १२ वर्षांखालील असल्याचे सांगण्यात आले. शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांमुळे दहशत वाढत आहे. दररोज त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना होत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने तीन वर्षांच्या बालकाला उचलून नेत लचके तोडल्याचा व्हिडीओ आणि काही फोटो गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, शहरात असा काही प्रकार घडल्याविषयी महापालिकेकडे तक्रार आली नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Dogs bite to 3-year-old boy; 7 children bitten by stray dogs in a day