खचू नका, पेरते व्हा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मोफत बियाणे
By विजय सरवदे | Updated: June 24, 2023 14:10 IST2023-06-24T14:10:06+5:302023-06-24T14:10:35+5:30
प्रथमच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद उपकरातून खर्चणार १० लाखांचा निधी

खचू नका, पेरते व्हा; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना जिल्हा परिषदेकडून मोफत बियाणे
छत्रपती संभाजीनगर : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला यंदाच्या खरीप हंगामात मदतीचा हात देण्यासाठी जिल्हा परिषद सरसावली आहे. जिल्ह्यातील जवळपास २०० कुटुंबांना मोफत बियाणे दिले जाणार असून यासाठी जि.प.च्या उपकरातून पहिल्यांदाच १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अलीकडच्या दोन वर्षांत घडलेल्या अशा घटनांतील पीडित कुटुंबांची भेट घेऊन कृषी विस्तार अधिकारी त्यांचा कल जाणून घेत आहेत.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमध्ये नवी उमेद जागृत करण्यासाठी त्यांना मोफत बियाणे देण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेतला. त्यासाठी पहिल्यांदाच १० लाखांची तरतूद करण्यात आली. आता पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्यानुसार जि.प. कृषी विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळवली आहे. या यादीत अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे बियाणे देण्यासाठी १० लाखांचा निधी अपुरा पडेल म्हणून अलीकडच्या दोन वर्षांतील पीडित शेतकरी कुटुंबांना मोफत बियाणांचा लाभ देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
‘डीबीटी’ तत्त्वानुसार राबविणार योजना
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनी अगोदर मोफत बियाणांची खरेदी करावी. त्यासंबंधी पावती दाखविल्यानंतर लगेच कृषी विभाग लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत एक लाभार्थ्यांना बियाणे खरेदीसाठी दिले जाणार आहेत. सध्या कृषी विस्तार अधिकारी निवड झालेल्या लाभार्थी कुटुंबांची भेट घेऊन कोणते पीक घेणार, किती हेक्टरवर पेरणी करणार, यासंबंधीची विचारपूस करत असून त्यांना बियाणे खरेदीविषयी माहिती दिली जात आहे.
पंधरा दिवसांत प्रक्रिया पूर्ण
आता पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला जात असून शेतकरी पेरणीसाठी तयार झाले आहेत. त्यामुळे लाभार्थी कुटुंबांचा कल जाणून ही योजना येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्यासाठी विस्तार अधिकारी कामाला लागले आहेत. अलीकडच्या दोन वर्षांतील पीडित कुटुंबांना बियाणे देऊन निधी उरल्यास त्याअगोदरच्या शेतकरी कुटुंबांचाही विचार केला जाईल.
- प्रकाश पाटील, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद