'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
By विकास राऊत | Updated: April 20, 2023 15:55 IST2023-04-20T15:54:24+5:302023-04-20T15:55:57+5:30
आतापर्यंत फक्त ३०० कि.मी. जलवाहिनीचे काम; विभागीय आयुक्तांनी कंत्राटदाराला सुनावले खडेबोल

'रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाका'; दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आयुक्तालयात तीन तास बैठक घेत कंत्राटदार कंपनी जीव्हीपीआरएसच्या मालकाला खडेबोल सुनावले. शहरात रोज ४ कि.मी. जलवाहिनी टाकण्याचे काम करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. मे अखेरपर्यंत सूचनेप्रमाणे काम झाले नाही तर काही कामे कमी करण्यात येतील, असा इशाराही आयुक्तांनी कंत्राटदाराला दिला. दिलेल्या आदेशाप्रमाणे काम झाले तरच मुदतीत योजना पूर्ण होईल, असे आयुक्तांनी कंत्राटदार व एमजेपीच्या अभियंत्यांना सांगितले.
कामाची गती वाढविण्यासाठी दोन महिन्यांची मुदत कंत्राटदारांनी मागितली; परंतु आयुक्तांनी नकार दिला. दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले. लोकवस्ती असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वी जलवाहिनी टाकून घ्या, पावसाळ्यात एखादी आपत्ती घडल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा बैठकीत कंत्राटदार, एमजेपीला देण्यात आला.
कॉफरडॅमचे काम दोन्ही बाजूंनी सुरू करण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. एक महिन्यात कामाची प्रगती पाहिली जाईल. दुसऱ्या महिन्यात विद्यमान कंत्राटदाराकडून किती काम करून घ्यायचे याचा निर्णय आयुक्त घेणार आहेत. जूनपर्यंत कॉफरडॅमचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले असून सोबतच रिटर्निंग वॉल, ब्रीजचे काम पुढे सरकले तरच योजनेचे काम वेळेत पूर्ण होईल. १५ जूनपर्यंत मुख्य जलवाहिनीसाठी लागणारे पाइप खरेदीची ऑर्डर देण्याचे आदेश केंद्रेेकर यांनी दिले. सध्या २२ कि.मी.चे पाइप आलेले आहेत. बैठकीला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, एमजेपीचे अभियंता व कंत्राटदार कंपनी मालकासह प्रतिनिधी उपस्थित होते.
आता आठवड्याला द्यावा लागणार अहवाल...
कंत्राटदार व एमजेपीला दर आठवड्याला विभागीय आयुक्तांना अहवाल द्यावा लागणार आहे. दररोज रात्री गस्त घालून दोन शिफ्टमध्ये काम सुरू आहे की नाही, याची नोंद घेतली जाणार आहे. ५५० मीटर ब्रीजचे काम जूनअखेरपर्यंत झाले पाहिजे. कॉफरडॅम, वॉलचे काम झाल्यावर जॅकवेलचे काम पावसाळ्यात होऊ शकते, यावर बैठकीत चर्चा झाली.
फक्त ३०० कि.मी. जलवाहिनीचे काम...
शहरात डिसेंबर २०२२ पासून आजवर ३०० कि.मी. जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. १९११ कि.मी. जलवाहिन्यांचे काम पूर्ण करावे लागणार आहे. रोज ४ कि.मी. जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी कंत्राटदाराला दिले. मात्र, कंत्राटदाराने रोज ३ कि.मी. काम करण्याबाबत सहमती दर्शविली. आयुक्त ४ कि.मी. काम करण्यावर ठाम राहिले. शहर जलवितरण व्यवस्थेसाठी १२०० ते १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.