दररोज घरच्या घरी करा ६ मिनिटे ‘वॉक टेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:02 AM2021-04-22T04:02:06+5:302021-04-22T04:02:06+5:30

औरंगाबाद : कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जरा दम लागला किंवा एखादी शिंक आली तरी अनेकजण ...

Do 6 minutes of ‘Walk Test’ at home every day | दररोज घरच्या घरी करा ६ मिनिटे ‘वॉक टेस्ट’

दररोज घरच्या घरी करा ६ मिनिटे ‘वॉक टेस्ट’

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. जरा दम लागला किंवा एखादी शिंक आली तरी अनेकजण भयभीत होत आहेत. ही भीती दूर करण्यासाठी घरच्या घरी दररोज सहा मिनिटांची वॉक टेस्ट करा आणि भयमुक्त व्हा, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. आज जवळपास प्रत्येक घरात ऑक्सिमीटर पाहायला मिळतो. त्यामुळे कधीही ऑक्सिजनची पातळी तपासता येते. दररोज नित्यनेमाने ऑक्सिजन पातळी तपासून पाहणारेही अनेक लोक आहेत. या सतर्कतेमुळे निश्चितच फायदा होत आहे. पण यापेक्षा जर ऑक्सिजन पातळी तपासण्याची शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली, तर मात्र नक्कीच अधिक फायदा होऊ शकतो.

ऑक्सिजनची पातळी तपासण्याची सर्वसामान्य पद्धत म्हणजे ऑक्सिमीटरमध्ये बोट टाकणे आणि ऑक्सिजनची पातळी सांगणारा जो आकडा समोर दिसतो तो खात्रीशीर असल्याचे समजणे. पण असे करण्यापेक्षा जर एकदा चाचणी केल्यानंतर सहा मिनिटांचा वॉक घेऊन पुन्हा ऑक्सिजन पातळी तपासली आणि दोन चाचण्यांदरम्यान येणारा आकडेवारीतला फरक लक्षात घेतला तर ती अधिक अचूक ऑक्सिजन तपासणी ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

- असे लागणार साहित्य

घड्याळ, पल्स ऑक्सिमीटर

चौकट :

अशी करा चाचणी

आपल्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने चालावे. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.

चौकट :

.... तर घ्या काळजी

- सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९०पेक्षा कमी झाली तर काळजी घ्यावी.

- चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतरची पातळी ५ किंवा त्यापेक्षा अधिकने कमी झाली तर काळजी घ्या.

- चालल्यानंतर धाप लागणे, दम लागल्यासारखे होत असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवावे.

चौकट :

कोणी करायची ही टेस्ट ?

सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती, गृह अलगीकरणात असलेल्या रूग्णांनी दररोज ही चाचणी करावी.

चौकट :

प्रतिक्रिया

सहा मिनिटे वॉक टेस्ट हा स्वत:च स्वत:ची तपासणी करण्याचा उत्तम उपाय आहे. लक्षणे नाहीत पण ऑक्सिजन पातळी कमी होत आहे, असेही काही रूग्णांच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीनेही एक दिवसाआड ही चाचणी करून स्वत:ची ऑक्सिजन पातळी तपासून घ्यावी. जेणेकरून लवकरच निदान होऊन वेळेत औषधोपचार सुरू करता येतात.

- डॉ. नीलेश लोमटे

एम. डी. मेडिसीन

Web Title: Do 6 minutes of ‘Walk Test’ at home every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.