Diwali 2025: ‘बायकोचे १२००, माझे हजार येणे, ते पैसे आले तर दिवाळी धुमधडाक्यात’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:36 IST2025-10-20T18:35:52+5:302025-10-20T18:36:53+5:30
Diwali 2025: सणाच्या प्रकाशात देणाऱ्यांच्या पैशावर अवलंबून ‘कामगारां’ची दिवाळी

Diwali 2025: ‘बायकोचे १२००, माझे हजार येणे, ते पैसे आले तर दिवाळी धुमधडाक्यात’
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : ‘बायकोचे १२००, माझे हजार येणे आहेत. ते पैसे आले तर दिवाळी धुमधडाक्यात करू’ हे शब्द आहेत मातीकाम करणाऱ्या कामगाराचे. त्यांची दिवाळी ‘देणाऱ्यांच्या’ पैशांवर अवलंबून आहे. सण तोंडावर असताना कामगारांच्या डोळ्यात प्रतीक्षा कायम आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशीपर्यंत पैशांची वाट पाहावी लागते. मालकाने पैसे दिले तरच घरात किराणा भरला जातो. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलते आणि तेव्हाच फराळाचा सुगंध पसरतो. अन्यथा दिवाळी म्हणजे एक दिवास्वप्न ठरते.
पैसे येणे बाकी
‘२५ वर्षं प्लंबिंगचे काम करतो. पण आजही दिवाळीचे नियोजन पैशावरच ठरते,’ असे आदिनाथ निकम सांगतात. त्यांची महिन्याची कमाई १२ हजारांच्या आसपास. सध्या ते दोन ठिकाणांहून येणाऱ्या पैशांची वाट बघत आहेत. ‘एकजण म्हणतोय उद्या देतो, दुसराही देणार म्हटलाय, पण पैसे हातात पडल्याशिवाय काही खरे नाही. पत्नी माती काम करून कमावते’.
कामच मिळाले नाही
भास्कर जाधव ३० वर्षांपासून बिगारी काम करतात. ‘काम असले तरच आमची दिवाळी,’ असे ते म्हणतात. यावर्षी सगळे साहेब लोक गावाला गेले, त्यामुळे कामच कमी मिळाले. पैसे आले तर दोघे मिळून छोटी दिवाळी करू. त्यांचे हे साधे वाक्य ऐकूनही दिवाळीचा खरा अर्थ समजतो.
दिवाळीच्या दिवशीही काम
बिगारी कामगार संतोष फिसफिसे म्हणतात, ‘आमची दिवाळी काम देणाऱ्यांवर अवलंबून असते. आठवड्याचे पैसे आम्ही घेतो. त्यामुळे सणाच्या आदल्या दिवशीही हात रिकामे असतात, तर फरशीचे काम करणारे संदीप आंबिलढगे सांगतात, ‘आमच्या क्षेत्रात एक मालक दुसऱ्यावर अवलंबून. वरच्याने पैसे दिले तेव्हाच आमच्या हातात येतात. भाऊबीजेला बहिणीला ओवाळणी देण्यासाठी दिवाळीच्या दिवशी दुपारपर्यंत काम करतो’. विकास आगळे म्हणतात, ‘कधी काम असते तर कधी नसते, सर्व अशाश्वत. म्हणून दिवाळीची काही खात्री नाही’. मातीकाम करणारे संजय अंभोरे, मनोहर मरपाते, सोमीनाथ ढगे म्हणाले, ‘दिवाळीत उधारीवरच सण साजरा करावा लागतो. किराणा, कपडे, फराळ सगळे कर्जावरच होते. मग पुढचे सहा महिने ते फेडण्यात जातात.’
यांचे हात रिकाम
कामगारांसाठीचे हजारो कोटी पडून आहेत. पण त्याचा खऱ्या कामगारांना काहीही फायदा नाही. ७० टक्के बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे यांचे हात दिवाळीतही रिकामे राहिलेत.
-मधुकर खिल्लारे, अध्यक्ष, कामगार संघटना