जि. प. : सभापती निवडीत आघाडी टिकली

By Admin | Updated: October 2, 2014 00:50 IST2014-10-02T00:49:43+5:302014-10-02T00:50:59+5:30

औरंगाबाद : राज्यातील आघाडी तुटली असली तरी जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आघाडी टिकविण्यात आज यश मिळविले.

District Par. : Leading the front of the chairmanship | जि. प. : सभापती निवडीत आघाडी टिकली

जि. प. : सभापती निवडीत आघाडी टिकली

औरंगाबाद : राज्यातील आघाडी तुटली असली तरी जिल्हा परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी आघाडी टिकविण्यात आज यश मिळविले. बुधवारी झालेल्या सभापतीपदाच्या निवडणुकीत चारही सभापती आघाडीचे विजयी झाले. त्यात काँग्रेसचे विनोद तांबे, राष्ट्रवादीच्या सरला मनगटे व मनसेचे संतोष जाधव आणि शीला चव्हाण यांचा समावेश आहे.
उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्या अध्यक्षतेखाली सभापती निवडीची विशेष सभा दुपारी ३ वाजता सुरू झाली. समाजकल्याण, महिला व बालकल्याण व त्यानंतर इतर विषय समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आली. समाजकल्याण सभापतीपदासाठी तिघांनी अर्ज भरले होते. त्यापैकी रामनाथ चोरमले यांनी अर्ज परत घेतला. मनसेच्या शीला विजय चव्हाण आणि शिवसेनेच्या योगिता रमेश बहुले यांच्यात लढत झाली. त्यात शीला चव्हाण यांना ३४ तर बहुले यांना २५ मते पडली. महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. शिवसेनेच्या सुरेखा जाधव यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरला मनगटे व भाजपाच्या डॉ. पल्लवी तुपे यांच्यात लढत होऊन ३३ मते घेऊन सरला मनगटे विजयी झाल्या. डॉ. तुपे यांना २६ मते पडली.
इतर दोन सभापतीपदासाठी काँग्रेसचे विनोद तांबे यांनी ३३ व मनसेचे संतोष जाधव यांनी ३५ मते घेऊन विजय संपादन केला. त्यांचे प्रतिस्पर्धी शैलेश क्षीरसागर यांना शून्य व हरिकिशन सुलताने यांना २६ मते पडली. एकूण ८ सदस्यांनी अर्ज भरले होते. परंतु दीपाली काळे, संतोष माने पाटील, मनाजी मिसाळ व सुदाम मोकासे यांनी अर्ज मागे घेतल्याने उपरोक्त चौघात लढत झाली.

Web Title: District Par. : Leading the front of the chairmanship