चोरीच्या पैशावरुन झाला वाद; नशा देऊन तरुणाचा गळा चिरून खून केल्यानंतर मृतदेह जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 13:55 IST2021-04-21T13:48:28+5:302021-04-21T13:55:28+5:30
जालना रोडवरील कुंभेफळ पाटीपासून १२० फूट अंतरावर मंगळवारी सकाळी तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला.

चोरीच्या पैशावरुन झाला वाद; नशा देऊन तरुणाचा गळा चिरून खून केल्यानंतर मृतदेह जाळला
करमाड : कुंभेफळ पाटीजवळ सकाळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत शेख आमिर शेख नजीर (२०, रा. नारेगाव) याचा मृतदेह आढळून आला होता. चोरीच्या पैशाच्या वादातून २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याचे मंगळवारी सायंकाळी पोलीस तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी शेख कामील ऊर्फ गुडु शेख जमील (२३) व शेख चांद शेख गणी (दोघे रा. नारेगाव) यांना अटक केली आहे, तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
जालना रोडवरील कुंभेफळ पाटीपासून १२० फूट अंतरावर मंगळवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र गतीने फिरवत दुपारपर्यंत मृतदेहाची ओळख पटवली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यात शेख कामील ऊर्फ गुडु शेख जमील (२३) व शेख चांद शेख गणी (दोघे रा. नारेगाव) या दोघांची नावे पुढे आली. दोघांना ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्यांनी शेख आमिरचा खून केल्याचे कबूल केले.
काही दिवसांपासून या तिघांमध्ये चोरीच्या पैशावरून वाद होता. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडणही झाले होते. याचा राग मनात धरून आमिरचा काटा काढण्याचा कट आरोपींनी रचला. आरोपींनी नारेगाव येथे सोमवारी रात्री आमिरला दारू व गांज्याच्या नशेत धुंद केले. त्यानंतर रिक्षाने त्याला कुंभेफळ पाटीवर निर्मनुष्य ठिकाणी आणण्यात आले. मध्यरात्रीनंतर ३ वाजेच्या सुमारास आरोपींनी आमिरचा धारदार शस्त्राने गळा चिरला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पुन्हा त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले. यातील २ आरोपींना अटक केली असून, इतर दोघांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, पो.नि. संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळुंके, प्रशांत पाटील, राजू नागलोत, गणेश राऊत, श्रीमंत भालेराव, संदीप जाधव, धीरज जाधव, विक्रम देशमुख ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे, योगेश तरमळे आदींनी केली आहे.