प्रशांत अमृतकर यांची अधिष्ठाता पदावरून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 12:48 IST2020-10-04T12:47:58+5:302020-10-04T12:48:21+5:30
पीएच. डी. चा व्हायवा घेण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करणारे डॉ. प्रशांत अमृतकर यांची मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शनिवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

प्रशांत अमृतकर यांची अधिष्ठाता पदावरून हकालपट्टी
औरंगाबाद : पीएच. डी. चा व्हायवा घेण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी करणारे डॉ. प्रशांत अमृतकर यांची मानवविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय शनिवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठात संवैधानिक अधिकाऱ्याला पदावरून निष्काशित करण्याची तब्बल १२ वर्षांनंतरची ही दुसरी मोठी घटना मानली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठात शनिवारी सायंकाळी परीक्षा व मूल्यमापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठ कायद्यातील ४८ (५) या कलमान्वये कुलगुरूंनी डॉ. नवनाथ आघाव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार व्हायरल झालेल्या संभाषणाच्या क्लीपमध्ये डॉ. प्रशांत अमृतकर यांचाच आवाज असल्याचे सिद्ध झाले आहे. अशा प्रवृत्तीमुळे विद्यापीठाचे व सर्व विद्याशाखांच्या अधिष्ठातांचे नाव बदनाम होईल. त्यामुळे त्यांची गाईडशिप काढावी व त्यांना अधिष्ठाता पदावरून निष्काशित करण्यात यावे. यानुसार बैठकीत उपस्थित सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन अमृतकर यांना अधिष्ठाता पदावरून निष्काशित केले.
डॉ. अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी करणाऱ्या विद्यार्थ्यास व्हायवा घेण्यासाठी साठ हजार रूपये मागितल्याचे प्रकरण ऑडिओ क्लीपद्वारे लोकमतने उघडकीस आणले होते.