जायकवाडीतून विसर्ग चार टप्प्यांत कमी; आवक १४,२५६ क्युसेक, विसर्ग २८,९९६ क्युसेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:40 IST2025-08-30T19:36:16+5:302025-08-30T19:40:06+5:30
आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतर चार वेळेस विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला.

जायकवाडीतून विसर्ग चार टप्प्यांत कमी; आवक १४,२५६ क्युसेक, विसर्ग २८,९९६ क्युसेक
पैठण : जायकवाडीत आवक वाढल्याने गुरुवारी रात्री ९ वाजेनंतर धरणाच्या दरवाजांची उंची चार फुटांपर्यंत वाढवून गोदावरी पात्रात ७५ हजार ४५६ क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. मात्र, आवक घटल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजेनंतर चार वेळेस विसर्ग हळूहळू कमी करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता केवळ २८ हजार ९९६ क्युसेक विसर्ग सुरू होता, अशी माहिती शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
जायकवाडीतून गोदावरी पात्रात आठ दिवसांपासून विसर्ग सुरू होता. आवक वाढल्याने गुरुवारी आधी १८ दरवाजे तीन फूट उघडून ५६ हजार ५९२ क्युसेक विसर्ग करण्यात आला. पण, आवक वाढल्याने रात्री नऊ वाजता दरवाजांची चार फुटांपर्यंत वाढवून ७५ हजार ४५६ क्युसेक विसर्ग केला होता. शुक्रवारी दोन वाजेपर्यंत हा विसर्ग सुरू होता. मात्र, उर्ध्व धरणांतून होणारी आवक घटल्याने दोन वाजेनंतर चारवेळेस हळूहळू विसर्ग कमी करण्यात आला. सध्या जायकवाडीतून २८ हजार ९९६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर, धरणात १४ हजार २५६ क्युसेकने आवक होत आहे.
सिद्धेश्वर मंदिरात पाणी
७५ हजार विसर्गामुळे शुक्रवारी पैठण येथील संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील घाटांच्या पायऱ्यालगत पाणी आले होते. हे पाणी बघण्यासाठी मोठी गर्दी नागरिकांनी केली होती. तसेच गोदावरीच्या शेजारीच असलेले सिद्धेश्वर महादेव मंदिर पाण्याने पूर्ण भरले होते. त्यामुळे दोन दिवसांपासून भाविकांना महादेवाचे दर्शन घेता आलेले नाही.