जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग; पैठण शहरात पाणी शिरलं, नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:14 IST2025-09-28T15:13:02+5:302025-09-28T15:14:21+5:30
जायकवाडी धरणाचे पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडले, गोदाकाठच्या अनेक गावातील ग्रामस्थांचे स्थलांतर

जायकवाडी धरणातून विक्रमी विसर्ग; पैठण शहरात पाणी शिरलं, नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर
- दादासाहेब गलांडे
पैठण: जायकवाडी धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी दिवसरात्र झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात आवक २ लाख ७५ हजार १६८ क्युसेक सुरू आहे .पुढील धोका टाळण्यासाठी जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडून २७ दरवाज्यातून टप्प्याटप्प्याने २ लाख २७ हजार क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला आहे.
विसर्ग वाढल्याने पैठण शहरातील सखल भागात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.दरम्यान, धरणावर सकाळी ११ .३० वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार विलास भुमरे यांनी भेट दिली. विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने पर्यटनास कोणीही धरणाकडे येऊ नये, तसेच सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मंत्री महाजन आणि आमदार भुमरे यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत संत उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार , व्यापारी महासंघाचे पवन लोहिया आदींनी जायकवाडी धरणाची पाहणी केली.
गावांचे स्थलांतर केले
नवगाव , हिरडपुरी ,कुरणपिंपरी या गावातील नागरिकांचे स्थलांतर शाळेत करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली . महसूल प्रशासनाचे पथक गोदाकाच्या गावातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आहेत.
विसर्ग तीन लाख क्युसेक पर्यंत जाणार
पाटेगावच्या पुलाच्या खालोखाल पाणी असून थोड्याच वेळात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा संपर्क तुटणार आहे . तसेच नाशिकचे पाणी संध्याकाळपर्यंत येणार आहे. आवकमध्ये आणखी वाढ झाल्यास गोदा पात्रेत ३ लाखापर्यंत विसर्ग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे .