शेतातून थेट KBC मंचावर; जिंकलेल्या ५० लाखांचे शेतकरी कैलास कुटेवाड काय करणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:25 IST2025-10-03T15:21:28+5:302025-10-03T15:25:44+5:30
शिक्षण बारावीपर्यंतच; पण जिद्द अफाट; पैठणच्या अल्पभूधारक शेतकऱ्याने KBC त जिंकले ५० लाख

शेतातून थेट KBC मंचावर; जिंकलेल्या ५० लाखांचे शेतकरी कैलास कुटेवाड काय करणार?
पैठण: तालुक्यातील बालानगरजवळील तांड्यावर राहणारे अल्पभूधारक शेतकरी कैलास रामभाऊ कुटेवाड (वय ४०) यांनी 'कोण बनेगा करोडपती' (KBC) या देशपातळीवरील प्रतिष्ठित ज्ञानस्पर्धेत थेट ५० लाख रुपयांचे घवघवीत पारितोषिक जिंकून ग्रामीण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि दोन एकर कोरडवाहू शेतीवर मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कैलास यांच्या जिद्दीची कहाणी प्रेरणादायी ठरली आहे.
६ वर्षांच्या प्रयत्नानंतर यश
मागील पाच वर्षांपासून सातत्याने KBC मध्ये रजिस्ट्रेशन करत असलेल्या कैलास यांना अखेर सहाव्या प्रयत्नात एप्रिल २०२५ मध्ये संधी मिळाली. सप्टेंबर १६ आणि १७ रोजी झालेल्या शूटिंगदरम्यान त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या समवेत मंचावर उपस्थित राहून १ ते १४ पर्यंतच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देत ५० लाख रुपयांचे बक्षीस मिळवले. गरिबीमुळे शिक्षण अर्धवट राहिले याची खंत मनात ठेवून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषयांचा स्वअभ्यास केला आणि हे यश मिळवले.
१ कोटीच्या प्रश्नावर खेळ सोडला
१ कोटी रुपये किंमतीच्या १५ व्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी कैलास यांना दोन लाईफलाईन वापरूनही योग्य उत्तराबाबत अनिश्चितता वाटली. त्यामुळे त्यांनी कोणताही धोका न पत्करता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपयांचे बक्षीस घेऊन ते KBC-१७ मधून बाहेर पडले. "राष्ट्रपती भवनात असलेली विवियन फोर्ब्स यांनी बनवलेली 'इन्व्हेन्शन ऑफ द प्रिंटिंग प्रेस' या शीर्षकाची पेंटिंग कोणाला दर्शवते?" हा त्यांना विचारलेला १ कोटी रुपयांचा प्रश्न होता.
मुलांचे भविष्य घडवणार
कैलास यांनी सांगितले की, "हे यश माझं नाही, आमचं गावाचं आणि मेहनत करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचं आहे." KBC मधून मिळालेली ही मोठी रक्कम ते मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी वापरणार आहेत. स्वतःचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या कैलास यांनी आता आपल्या दोन्ही मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.