घृष्णेश्वर मंदिरात थेट गाभारा दर्शन बंद; वाढत्या गर्दीमुळे भाविकांना आता उंबरठ्यावरूनच दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:35 IST2025-12-27T18:33:19+5:302025-12-27T18:35:07+5:30
कोरोना काळात काही महिने अशा पद्धतीने दर्शन दिले जात होते, पण आता ही पद्धत कायमस्वरूपी राहणार की केवळ गर्दीपुरती मर्यादित आहे, याबाबत संभ्रम आहे.

घृष्णेश्वर मंदिरात थेट गाभारा दर्शन बंद; वाढत्या गर्दीमुळे भाविकांना आता उंबरठ्यावरूनच दर्शन
- सुनील घोडके
खुलताबाद (छत्रपती संभाजीनगर): बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली थेट दर्शन पद्धत आज (शनिवार, दि. २७) दुपारपासून अचानक बंद करण्यात आली आहे. नाताळच्या सुट्ट्यांमुळे झालेली तुफान गर्दी आणि लांबच लांब लागलेल्या रांगांमुळे मंदिर प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून भाविकांना गर्भगृहात प्रवेश नाकारला असून प्रवेशद्वारावरच दर्शन व्यवस्था केली आहे.
श्री घृष्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक सामान्य भाविकाला थेट ज्योतिर्लिंगावर डोके टेकवून किंवा स्पर्श करून अभिषेक करण्याची मुभा होती. मात्र, गेल्या चार दिवसांपासून वेरूळ लेणी आणि मंदिर परिसरात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. आज सकाळी दर्शनासाठी ४-४ तास लागत होते. ही गर्दी नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाने दुपारी १२ वाजता गर्भगृहाचे दरवाजे बंद केले आणि सभामंडपाच्या उंबरठ्यावरच शिवलिंगाची मूर्ती ठेवून 'बाह्य दर्शन' सुरू केले.
भाविकांमध्ये नाराजीचे सूर
अनेकांनी श्रद्धेपोटी दूरवरून थेट दर्शनाची आस धरून प्रवास केला होता, मात्र उंबरठ्यावरून दर्शन घ्यावे लागल्याने भाविक भावूक झाले होते. कोरोना काळात काही महिने अशा पद्धतीने दर्शन दिले जात होते, पण आता ही पद्धत कायमस्वरूपी राहणार की केवळ गर्दीपुरती मर्यादित आहे, याबाबत संभ्रम आहे. मंदिर देवस्थानचे अध्यक्ष कुणाल दांडगे आणि विश्वस्त राजेंद्र कौशीके यांनी या विषयावर सध्या तरी भाष्य करण्याचे टाळले आहे.