डिजिटल अरेस्टचा फास; माजी अतिरिक्त उद्योग संचालक ३० लाखांना फसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:01 IST2025-03-13T16:59:18+5:302025-03-13T17:01:45+5:30
भयंकर प्रकार : कुटुंबापासून दूर नेण्यासाठी हॉटेलात थांबायला भाग पाडले

डिजिटल अरेस्टचा फास; माजी अतिरिक्त उद्योग संचालक ३० लाखांना फसले
छत्रपती संभाजीनगर : दहशतवाद, अंमली पदार्थांच्या तस्करीत बँक खात्यांना तुमच्या आधार कार्डचा वापर झाला आहे, असे सांगत सेवानिवृत्त उच्च पदस्थ शासकीय अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ३० लाख ४० हजारांचा गंडा घातला. सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी मंगळवारी गुन्हा दाखल झाला.
विश्वनाथ राजाळे (६१, रा. एन. ७) २०२०मध्ये अतिरीक्त उद्योग संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले. काही महिन्यांपूर्वी त्यांना कुरिअर कंपनीच्या नावे काॅल आला. मोबाइलवर सीबीआयच्या बनावट लोगोची कागदपत्रे पाठवली. तोतया अधिकाऱ्यांनी संपर्क करून राजाळे यांच्या तीन बँक खात्यांचा अंमली पदार्थ, दहशतवादासाठी वापर झाला आहे. याचा तपास करण्यासाठी त्यांनी राजाळेंना स्काईपद्वारे व्हिडीओ कॉल सुरू केले. कॉलवरील व्यक्तीने नरेश गुप्ता बॅनर्जी नाव सांगून पोलिसाचे ओळखपत्र पाठवले. बलसिंग राजपूतने पोलिस उपायुक्त म्हणून कॉल करून त्याने एका नेत्याला अटक केल्याचे छायाचित्र पाठवले. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात राजाळे संमोहित होऊन घाबरून गेले होते.
आठ क्रमांकावरून संपर्क, अधिकाऱ्यासारखे दालन
सायबर गुन्हेगारांनी राजाळे यांना विविध ८ क्रमांकांवरून काॅल केले. व्हिडीओ कॉलमध्ये पोलिसांसारखे दालन, पोलिसांचे चिन्ह वापरण्यात आले. बँक व्यवहाराची तपासणी करण्याचे कारण खात्यातील रक्कम एका पोर्टलवर वळवण्याची सूचना करून ३० मिनिटांत परत करण्याचे आश्वासनही दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवत राजाळे यांनी ईव्हलँड कॉमेस्टीबल प्रा. लि. नावाच्या एसबीआय बँक खात्यावर ३० लाख ४० हजार रुपये वळते केले. हे खाते गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील नानपुराचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
कुटुंबापासून दूर नेले
राजाळे कुटुंबाला हा प्रकार सांगतील, या शक्यतेने गुन्हेगारांनी त्यांना हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यासाठी धमकावले. घर व हॉटेल मिळून राजाळे तब्बल सहा दिवस डिजिटल अरेस्टमध्ये राहिले. सहाव्या दिवशी त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले.
वकिलाची उच्च शिक्षित मुलगी फसली
डिजिटल अरेस्टमध्ये सेवानिवृत्त अधिकारी, वृध्दांसह तरुणींना लक्ष करण्यात येत आहे. शहरातील एका वकिलाच्या उच्च शिक्षित मुलीला सायबर गुन्हेगारांनी तब्बल १८ तास डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले. बदनामीपोटी अनेकजण तक्रार करत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.