मुख्यमंत्री फडणवीसांचे अक्षर पाहिले का? घृष्णेश्वराच्या व्हिजिटिंग बुकमध्ये 'हस्ताक्षर अभिप्राय'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 17:15 IST2025-11-26T17:12:17+5:302025-11-26T17:15:02+5:30
घृष्णेश्वराच्या व्हिजिटिंग बुकमध्ये फडणवीसांनी व्यक्त केली भावनिक 'मनोकामना', हस्ताक्षर पाहून शिवभक्त भारावले

मुख्यमंत्री फडणवीसांचे अक्षर पाहिले का? घृष्णेश्वराच्या व्हिजिटिंग बुकमध्ये 'हस्ताक्षर अभिप्राय'!
खुलताबाद: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराला भेट दिली आणि त्यांनी दर्शनानंतर नोंदवलेला अभिप्राय केवळ शब्दांतच नाही, तर त्यांच्या सुंदर हस्ताक्षरात उतरल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिजिटिंग बुकमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात अत्यंत भावनिक अभिप्राय नोंदवत, 'आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो' अशी मनोकामना व्यक्त केली.
आदि योगींच्या दर्शनानंतर हस्ताक्षरात उतरल्या भावना
राजकीय व्यक्तींचे दौरे आणि भाषणे नेहमीच चर्चेत असतात, पण अनेकदा त्यांचे वैयक्तिक हस्ताक्षर पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी मात्र घृष्णेश्वर मंदिरात व्हिजिटिंग बुकमध्ये अभिप्राय नोंदवून शिवभक्तांना एक वेगळी भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे हस्ताक्षर स्पष्ट, वळणदार आणि सुवाच्य असल्याने ते वाचताना अधिक आपुलकीचे वाटते. त्यांनी या क्षेत्राला 'अंत्यत उर्जादायी' असे संबोधले. ज्योतिर्लिंगांच्या परंपरेतील या क्षेत्राबद्दल व्यक्त केलेली आत्मीयता त्यांच्या हस्ताक्षरातून अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचली.
राजकारणी नव्हे, शिवभक्ताची मनोकामना!
राजकीय व्यासपीठावर विरोधकांवर टीका करणारे नेते, जेव्हा मंदिराच्या शांत वातावरणात व्हिजिटिंग बुकमध्ये आपले विचार नोंदवतात, तेव्हा त्यांच्यातील 'माणूस' पाहायला मिळतो. व्हिजिटिंग बुकमधील फडणवीसांचे हस्ताक्षर आणि त्यांचे 'सर्वांना आशिर्वाद लाभो' हे साधे पण प्रामाणिक शब्द, त्यांच्यातील शिवभक्ताची ओळख करून देतात. मंदिर देवस्थानसाठीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ताक्षरातील हा अभिप्राय एक महत्त्वपूर्ण दस्तावेज ठरला आहे. या निमित्ताने, राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक हस्ताक्षर आणि त्यांच्या साध्या भावना थेट जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत.