धुळ्यातील शाळेचा चपराशीच मराठवाड्यातील 'नशे'चा पुरवठादार, १८ हजार बाटल्या जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 17:07 IST2025-10-16T16:25:23+5:302025-10-16T17:07:52+5:30

नशेसाठीची एक बाटलीची किंमत १७५ रुपये, शिपायाला मिळायची ५५ रुपयांत, नशेखोरांना ३५० रुपयांत विक्री

Dhule School peon is the supplier of 'drugs', more than 18 thousand bottles seized | धुळ्यातील शाळेचा चपराशीच मराठवाड्यातील 'नशे'चा पुरवठादार, १८ हजार बाटल्या जप्त!

धुळ्यातील शाळेचा चपराशीच मराठवाड्यातील 'नशे'चा पुरवठादार, १८ हजार बाटल्या जप्त!

छत्रपती संभाजीनगर : धुळ्यातील शाळेत चपराशी असलेल्या कल्पेश चंदुलाल अग्रवाल (३८, रा. पद्मनाभनगर, धुळे) हा मध्यप्रदेश व गुजरातहून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या व पातळ औषधांची तस्करी करून संपूर्ण मराठवाड्यात पुरवठा करत होता. ही बाब उघडकीस येताच गुन्हे शाखेच्या ४ पथकांनी मध्यप्रदेश, गुजरात गाठत दुर्गेश सीताराम रावत (५४, रा. इंदूर) व धर्मेंद्र ऊर्फ गोपाल खेमचंद प्रजापती (३२, रा. अहमदाबाद) या दोन एजन्सीचालकांना अटक केली. त्यांच्याकडे अवैधरीत्या साठवून ठेवलेला १८ हजार ३६० बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, १७५ रुपये मूळ किंमत असलेली एक बाटली अग्रवालला ५५ रुपयांत मिळत होती. नशेखोरांना ३५० रुपयांपर्यंत विक्री केली जात.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मूळ पेडलर्सचे सिंडिकेटच मोडून काढण्यासाठी नियोजन केले. एएनसी, गुन्हे शाखेसह विशेष पथक यासाठी सातत्याने कारवाई करत आहेत. त्यात ९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक रवीकांत गच्चे, विनायक शेळके यांच्या पथकांनी अग्रवालसह सय्यद नबी सय्यद लाल (३३, रा. वाळूज) यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या कारमधून १०० गोळ्यांचे लपवलेले पाकीट जप्त केले. अग्रवालचे सय्यद नबी सय्यद लाल व ज्ञानेश्वर मनोहर यादव ऊर्फ माउली (रा. जयभवानीनगर) यांच्यासोबतचे ८ वर्षांपासूनचे अमली पदार्थांचे हे मोठे रॅकेट गुन्हे शाखेने अखेर मोडून काढले आहे.

चार पथके, दोन दिवसांत १८ हजारांचा साठा जप्त
अग्रवाल रावत व प्रजापतीकडून औषधांचा साठा मागवत असल्याचे निष्पन्न झाले. बँक खात्याद्वारे त्यांच्यात ४ महिन्यांत लाखोंचे व्यवहार झाले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या सूचनेवरून निरीक्षक संभाजी पवार यांनी ४ पथके तयार केली. २ दिवसांत पथकांनी इंदूर व अहमदाबाद गाठत रावत, प्रजापतीच्या गोडावूनमध्ये छापे टाकत तब्बल १८ हजार ३६० बेहिशेबी बाटल्यांचा साठा उघड केला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.

तब्बल १५ हजारांच्या गोळ्यांची ऑर्डर
अग्रवाल २०१७ पासून या रॅकेटमध्ये सक्रिय आहे. २०१८ मध्ये नबी व त्याला अटक झाली हाेती. औषधांची ऑर्डर करण्यासाठी त्याने सुरतच्या मित्राच्या नावे बनावट औषध परवाना तयार करून धुळ्यात ट्रॅव्हल्स, कुरिअरमार्गे मागवला होता. त्याची खात्री न करताच प्रजापती, रावत औषधांचा पुरवठा करत होते. गेल्या ५ महिन्यांत अग्रवालने त्यांच्याकडून तब्बल १२ ते १५ हजारांच्या गोळ्यांची ऑर्डर दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. शिवाय, सात दिवसाला तो शहरात ८०० बाटल्यांचा पुरवठा करत होता.

यांनी केली कारवाई
पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक पोलिस निरीक्षक रवीकांत गच्चे, विनायक शेळके, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, सहायक फौजदार दिलीप मोदी, अंमलदार प्रकाश गायकवाड, अशरफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, सागर पांढरे यांनी ही कारवाई पार पाडली.

Web Title : स्कूल चपरासी: नशीले पदार्थों का आपूर्तिकर्ता; 18,000 से अधिक बोतलें जब्त।

Web Summary : धुले में एक स्कूल चपरासी गुजरात और मध्य प्रदेश के रास्ते मराठवाड़ा में नशीले पदार्थों की आपूर्ति करता था। पुलिस ने 18,000 से अधिक बोतलें जब्त कीं और इंदौर और अहमदाबाद से आपूर्तिकर्ताओं को गिरफ्तार किया। वह भारी मुनाफे पर दवाएं बेचता था।

Web Title : School Peon: Drug Supplier; Over 18,000 Bottles Seized.

Web Summary : A school peon in Dhule supplied drugs across Marathwada via Gujarat and Madhya Pradesh. Police seized over 18,000 bottles and arrested suppliers from Indore and Ahmedabad. He sold the drugs for huge profit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.