'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 19:52 IST2021-10-08T19:51:49+5:302021-10-08T19:52:31+5:30
Aurangabad Municipal Corporation सुरक्षारक्षकांची नजर चुकवत ते आमरण उपोषणाचे बॅनर घेऊन निंबाच्या झाडावर चढले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

'वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा'; महापालिकेजवळील झाडावर चढून तरुणाचे आंदोलन
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच सर्व इच्छुक उमेदवार चांगलेच कामाला लागले आहेत. नागरी प्रश्नांवर सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मनपासमोर आंदोलने सुरू आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक एक आंदोलक मनपा प्रवेशद्वारासमोरील ( Aurangabad Municipal Corporation ) निंबाच्या झाडावर चढून घोषणा देऊ लागला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. एक तासाच्या परिश्रमानंतर आंदोलन करणारा तरुण अतिरिक्त आयुक्तांच्या विनंतीला मान देत खाली आला.
त्यापूर्वी आंदोलकाला जमिनीवर आणण्यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था करून ठेवली होती. फारूकी नजोरोद्दीन एकबालोद्दीन असे या झाडावर चढून आंदोलन करणाऱ्याचे नाव आहे. त्यांनी वॉर्ड क्रमांक ६७, समतानगरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे निवेदने दिली. दोन दिवसांपूर्वीच ‘माझ्या वॉर्डाचा विकास करा किंवा माझे अंतिम संस्कार करा’, अशा आशयाचे निवेदन भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या लेटरहेडवर दिले. शुक्रवारी सकाळी फारूकी मुख्यालयी आले.
सुरक्षारक्षकांची नजर चुकवत ते आमरण उपोषणाचे बॅनर घेऊन निंबाच्या झाडावर चढले. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. सुरक्षारक्षकांनीही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने मुख्यालयात एकच खळबळ उडाली. बघ्यांची गर्दी जमली होती. त्यापूर्वी प्रशासनाने आंदोलकाला खाली आणण्यासाठी मोठी जाळी आणून ठेवली. अग्निशमन विभागाचे अत्यंत कुशल कर्मचारी वाहनासह बोलवण्यात आले. ही कसरत सुरू असताना अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांनी धाव घेत फारूकींना खाली येण्याची विनंती केली. पोलिसांत गुन्हा दाखल करणार नाही, असे आश्वासन फारूकी यांनी घेतले. त्यानंतर ते चूपचाप क्रेनद्वारे खाली उतरले. प्रशासनाने त्यांना वॉर्डातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.