मैत्रेय फसवणूक प्रकरणातील ५५०० गुंतवणूकदारांनी पोलिसांना दिले विवरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:20 IST2018-09-28T17:19:50+5:302018-09-28T17:20:41+5:30
गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीची मालमत्ता जप्त करून तक्रारदारांना त्यांचे पैसे परत करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या.

मैत्रेय फसवणूक प्रकरणातील ५५०० गुंतवणूकदारांनी पोलिसांना दिले विवरण
औरंगाबाद : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीची मालमत्ता जप्त करून तक्रारदारांना त्यांचे पैसे परत करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरू केल्या. पोलिसांच्या आवाहनानंतर सुमारे साडेपाच हजार गुंतवणूकदारांनी त्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि गुंतविलेल्या रकमेचे विवरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सादर केले.
मैत्रेय कंपनीने एजंटामार्फत औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे एक ते दीड लाख लोकांनी मैत्रेय कंपनीत रकमा गुंतविल्या. कंपनीने अचानक विविध ठिकाणची कार्यालये बंद करून पोबारा केला. शहरातील उस्मानपुरा ठाण्यात मैत्रेयविरोधात गुन्हा नोंद झाला. त्यानंतर तक्रारदारांची संख्या वाढल्याने तत्कालीन पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. तर सरकारने याविषयी स्वतंत्र राज्यस्तरीय तपास पथक स्थापन केले.
दरम्यानच्या काळात मैत्रेयच्या सर्व मालमत्ता शोधून काढण्यात आल्या. या मालमत्तांचा जाहीर लिलाव करून गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. त्यानुसार गुंतवणूकदारांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती, गुंतवणुकीसंबंधीची कागदपत्रे आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत जमा करण्याचे आवाहन केले होते. याविषयीचे वृत्त प्रकाशित होताच, गुंतवणूकदार आर्थिक गुन्हे शाखेकडे कागदपत्रे जमा करीत आहेत. आठ ते दहा दिवसांत सुमारे साडेपाच हजार गुंतवणूकदारांनी कागदपत्रे जमा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.