सेनेतील असंतोषानंतरही ओझा यांच्या प्रचारात नगरसेवक

By Admin | Updated: October 2, 2014 01:21 IST2014-10-02T01:21:23+5:302014-10-02T01:21:51+5:30

औरंगाबाद : उमेदवारीवरून शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

Despite the dissatisfaction with the army, Ojha campaigned for corporator | सेनेतील असंतोषानंतरही ओझा यांच्या प्रचारात नगरसेवक

सेनेतील असंतोषानंतरही ओझा यांच्या प्रचारात नगरसेवक

औरंगाबाद : उमेदवारीवरून शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मात्र, पूर्व मतदारसंघात सर्व नाराजी, मतभेद विसरून नगरसेवक व पदाधिकारी कला ओझा यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. बुधवारी सकाळी सिडको एन-६ परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेत या परिसरातील तीन नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग तर वाखाणण्याजोगा होता.
विधानसभेच्या जागा वाटपावरून शिवसेनेतील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पक्षहितासाठी सर्व जण आपसातील मतभेद विसरून एकत्र येत आहेत. याची प्रचीती आज सिडको एन-६ परिसरातील शिवसेनेच्या पदयात्रेत आली. पूर्व मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार कला ओझा यांच्या पदयात्रेत या परिसरातील तीन नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २५ वर्षांची युती तोडणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला हरवायचेच असा निश्चय सर्वांनी यावेळी व्यक्त केला.
कला ओझा यांनी बुधवारी सकाळी सिडको एन-६ येथून पदयात्रेला सुरुवात केली. सकाळी ९.३० वाजता शिवज्योती कॉलनीत ढोल-ताशांच्या गजरात पदयात्रा निघाली.
यावेळी सिडको एन-६, एन-७ परिसरातील महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. जयघोष करीत कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होत होते. यानंतर ही पदयात्रा, संभाजी कॉलनीत पोहोचली. तेथेही अनेक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. जी-सेक्टर, सिंहगड कॉलनी, शुभश्री कॉलनी, सह्याद्री कॉलनीत अनेक ठिकाणी कला ओझा यांचे हार घालून स्वागत करण्यात येत होते. फटाके वाजविले जात होते.
पदयात्रेची आविष्कार कॉलनीत सांगता झाली. आविष्कार कॉलनीतील नगरसेवक वीरभ्रद गादगे, एन-६ येथील नगरसेवक हुशारसिंग चव्हाण, बजरंग कॉलनी परिसरातील नगरसेविका प्राजक्ता भाले, मंगेश भाले यांच्यासह संतोष जेजूरकर, मकरंद कुलकर्णी, विलास राऊत, अनिल पोलकर, चंद्रकांत गवई, विश्वनाथ स्वामी, रमेश ठोंबरे, बद्रीनाथ ठोंबरे, मुन्ना राजपूत, मीरा देशपांडे, विद्या अग्निहोत्री, राखी शिरोडकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Despite the dissatisfaction with the army, Ojha campaigned for corporator