४०० वर्षांच्या मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभारण्याची मागणी; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:24 IST2025-11-05T16:23:57+5:302025-11-05T16:24:39+5:30
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले मनपाला अंदाजपत्रकाचे निर्देश

४०० वर्षांच्या मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभारण्याची मागणी; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देश
छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाच्या पाठीमागील मकबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मकाई गेटच्या बाजूने पर्यायी पूल उभा करावा, अशी मागणी नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली. पालकमंत्र्यांनी मनपा प्रशासनाला अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश दिले. या कामासाठी निधीही देण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
मकाई गेटच्या संवर्धनाचे काम पुरातत्व विभागाने अलीकडेच हाती घेतले होते. या कामासाठी गेटमधून वाहतूक सहा महिन्यांसाठी बंद करण्यात आली होती. यामुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांना बराच त्रास सहन करावा लागत होता. मकाई गेटवरील पूल सुमारे ४०० वर्षापूर्वी बांधण्यात आला आहे. हा पूल भविष्यात कधीही कोसळू शकतो. त्यामुळे पर्यायी पुलाची गरज आहे. बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, जयसिंगपुरा भागात ऐतिहासिक बीबीचा मकबरा, लेण्या, विद्यापीठ, नागसेनवनातील महाविद्यालय, डीकेएमएम वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था आहे. तसेच घाटीचे बहुतांश कर्मचारी या परिसरात राहतात. सर्वांना मुख्य रस्ता मकाई गेट पुलावरून आहे.
मकबरा, लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांची सुध्दा मोठी गैरसोय होते. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त लेणीवर मोठा उत्सव होतो, छावणी परिसरात ईदगाह येथे ईदनिमित नमाजकरिता येथून लोक जातात. नामविस्तार दिन साजरा करण्यासाठी लाखोंची गर्दी होते, देशी-विदेशी पर्यटकांची वाहने, मोठ्या बस जाण्यास अडचण होते, याशिवाय दररोज वाहनांच्या हादऱ्यामुळे मकाई गेट आणि जुना पूल खचत आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नवीन पर्यायी पूल तयार करण्यात यावा, अशी विनंती नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी माजी नगरसेवक गणू पांडे, ज्ञानेश्वर जाधव, शिवसेना संपर्कप्रमुख प्रतिभा जगताप, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड, प्रा. फुलचंद सलामपुरे, संदेश वाघ, प्रा. संजय बिरंगणे, प्रा. एम.जी. शिंदे, सईद खान आदी उपस्थित होते.