ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:39 IST2025-03-28T12:38:52+5:302025-03-28T12:39:17+5:30
छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते.

ऐन सुट्यांमध्ये दिल्ली विमान प्रवासाचे भाडे भिडले गगनाला; प्रवाशांच्या खिशाला कात्री
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून मे महिन्यात दिल्लीला विमानाने जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. कारण मे महिन्यातील दिल्ली विमानाचे प्रवास भाडे गगनाला भिडले आहे. त्यामुळे विमान प्रवासी आणि टूर व्यावसायिकांकडून ओरड होत आहे.
छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीसाठी एअर इंडियाचे विमान सकाळी ७:४० वाजता उड्डाण घेते. तर इंडिगोचे विमान सायंकाळी ६:५५ वाजता उड्डाण घेते. मे महिन्यात दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागत आहे. शालेय सुट्यांमुळे मे महिन्यात पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा गैरफायदा घेत विमान कंपन्यांनी भाडेवाढीचा दणका दिल्याची ओरड होत आहे.
१० हजार रुपये
मे महिन्यात दिल्ली गाठायची तर एअर इंडियासाठी १० हजार व इंडिगोसाठी ७ हजार ५०० रुपये कमीत कमी मोजावे लागत आहेत. तारखेनुसार यात वेगवेगळे दर आहेत. तसेच हैदराबाद, मुंबई, बंगळुरू विमान प्रवास तिकीट दरांची मनमानी सुरू आहे. संध्याकाळी मुंबईहून येणारे व जाणारे विमान दररोज उशिरा उड्डाण घेते. त्यामुळे अनेकांचे आंतरराष्ट्रीय विमान चुकत आहे, असे ट्रॅव्हल एजंट असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.
या समस्येची दखल घेणारे नेते नाहीत
प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत दोन्ही विमान कंपन्यांनी स्वस्त फेअरचे बुकिंग क्लास बंद करून महाग फेअर क्लास सुरू केला. अवाजवी नफेखोरी सुरू केली. दिल्लीसाठी फक्त दोन विमाने आहेत. यावर बोलणारे कोणी नेते नाहीत. कंपन्यांवर अंकुश नसल्याने त्यांचे फावते. असोसिएशनमार्फत इंडिगो विमान कंपनीला मुंबईच्या विमानाची वेळ थोडी लवकर करावी आणि दिल्लीसाठी सकाळचे अजून एक विमान सुरू करा, अहमदाबादला एक विमान द्यावे, आदी मागण्या केल्या आहेत.
- मंगेश कपोते, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबाद