एमबीए तरुणाने मैत्रिणीच्या मदतीने रचला सराफ्याला लुटण्याचा प्लॅन; कर्मचाऱ्यामुळे कट उघड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:26 IST2025-04-24T15:26:02+5:302025-04-24T15:26:43+5:30
दागिन्यांसाठी पुण्यावरून येताच पोलिसांकडून अटक

एमबीए तरुणाने मैत्रिणीच्या मदतीने रचला सराफ्याला लुटण्याचा प्लॅन; कर्मचाऱ्यामुळे कट उघड...
छत्रपती संभाजीनगर : ऑनलाईन ॲपद्वारे ओळख झालेल्या मैत्रिणीच्या मदतीने एका एमबीए उत्तीर्ण तरुणाने शहरातील सराफा व्यावसायिकाचे दागिने लुटण्याचा कट रचला. त्यासाठी व्यावसायिकाच्याच कामगाराचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून तरुणाला रविवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. राहुल निवृत्ती सकटे (३६, रा. पुणे) व ममता अनिल उलेमाले (रा. टिळक पथ) अशी आरोपींची नावे आहेत.
मधुबाला जिगनेश चंद्राणी यांचे कासारी बाजारात स्वामी नारायन ज्वेलर्स हे दालन आहे. त्यांच्या दालनात अमोल मैड, ममता उलामाले, मयूर टेरहे व शुभम साळवे काम करतात. २७ मार्चला अमोलला 'तुला पैशांची गरज आहे. मी तुला मदत करू शकतो. दुकानात काम करणाऱ्या सगळ्यांकडे पैसे आहेत. फक्त तुझ्याकडे नाही. जर तू दुकानातील दागिने काढून मला दिलेस, तर तुलाही पैसे मिळतील.' असा मेसेज प्राप्त झाला. अमोलने तो प्रामाणिकपणे चंद्राणी कुटुंबाला दाखवला तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे अमोल मेसेजला सकारात्मक रिप्लाय देत गेला. २१ एप्रिलला अमोलला मेसेज प्राप्त झाला. त्यात संबंधिताने अमोलला दुकानातील सर्व सोन्याचे दागिने, तिजोरीतील पैसे, गहाण सोने बॅगमध्ये भरण्यास सांगितले.
चंद्राणी कुटुंबाने रचला सापळा
चंद्राणी कुटुंबाने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याला रंगेहात पकडण्याचे ठरवले. २२ एप्रिलला अमोलला दागिन्यांची बॅग घेण्यासाठी येत असल्याचा मेसेज प्राप्त झाला. त्यासाठी व्यावसायिकाने एका बॅगमध्ये बनावट दागिने भरले. ठरल्याप्रमाणे दालनाजवळच बॅग घेण्यासाठी संशयित येताच सर्वांनी मिळून त्याला पकडले. निरीक्षक संभाजी पवार यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक निवृत्ती गायके, अर्जुन कदम यांनी धाव घेत त्याला अटक केली. चौकशीत त्याचे राहुल सकटे नाव निष्पन्न झाले.
वीस वर्षांपासून कामाला तरीही
-मूळचा सांगलीचा असलेला राहुल पुण्यात राहतो. मात्र, तो कर्जबाजारी झाला आहे. एका ऑनलाईन ॲपद्वारे त्याची चंद्राणी यांच्याकडे २० वर्षांपासून कामाला असलेल्या ममतासोबत ओळख झाली. त्या दोघांनी हा कट रचला होता.
-जानेवारी, २०२५ मध्ये चंद्राणी यांच्या दुकानासमोर बंद लिफाफ्याद्वारे अज्ञाताने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली होती.
-विशेष म्हणजे, राहुलने अमोलला मेसेज करण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय ॲपवर पैसे खर्च करून आंतरराष्ट्रीय रचनेच्या संपर्क क्रमांकाचा वापर केला.