गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:30 IST2025-08-05T11:27:06+5:302025-08-05T11:30:58+5:30
नागरी वसाहतीत घडलेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गंगापूरात धाडसी घरफोडी; सराफा व्यावसायिक पती-पत्नीला मारहाण, रोख रक्कमेसह सोने लुटले
गंगापूर: ज्वेलर्स व्यावसायिकाच्या घरात घुसून चोरट्यांनी कोयत्याच्या धाकावर पती-पत्नीला महाराण करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन धाडसी चोरी केल्याची घटना सोमवारी (दि.४) रात्री साडेदहाच्या सुमारास वैजापूर मार्गावरील वर्धमान रेसिडेन्सी येथे घडली. भर नागरी वसाहतीत घडलेल्या धाडसी चोरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आनंदराव निवृत्ती पाटील हे गंगापूरमधील वर्धमान रेसीडेंसीमध्ये पत्नीसमवेत राहतात. त्यांचे शहरातील खंडोबा मंदिर परिसरात ज्वेलर्स दुकान आहे. सोमवारी रात्री ८ वाजता आपले दुकान बंद करून ते घरी आले. यानंतर १० वाजता पत्नीसमवेत जेवण करीत असताना तीन जण कोयता हातात घेऊन त्यांच्या घरात घुसले. दरवाजा आतून बंद करत चोरट्यांनी पती-पत्नीस दमदाटी केली. पाटील यांनी हिंमतीने दोघा चोरट्यांना झटापटीत पकडले. मात्र तिसऱ्या चोरट्याने कोयत्याने डोक्यावर वार करून पाटील यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर पाटील यांच्या पत्नीलाही मारहाण केली. पाटील पती पत्नीचे हातपाय बांधून चोरट्यांनी त्यांच्या तोंडात कपडा कोंबला.
बाहेरून कडी लावून झाले पसार...
पाटील दाम्पत्याला बांधून ठेवल्यानंतर चोरट्यांनी घराची संपूर्ण झडती घेतली. पाटील यांनी दुकानातून आणलेले रोख अडीच ते तीन लाख रुपये. पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण चोरट्यांच्या हाती लागली. ते घेऊन चोरटे दरवाजाला बाहेरून कडी लावून पसार झाले.
शेजाऱ्यांच्या मदतीने सुटका
पती-पत्नींनी एकमेकांचे हातपाय सोडून खिडकीतून बाहेर आवाज दिल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला. पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. शेजाऱ्यांनी गंभीर जखमी पाटील यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोनि कुमारसिंग राठोड यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. भरनागरी वसाहतीत मारहाण करीत झालेल्या धाडसी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.