सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:14 IST2025-10-31T16:13:20+5:302025-10-31T16:14:31+5:30

एटीएससह गुप्तचर यंत्रणांकडून समांतर चौकशी सुरू, राज्यातील रॅकेटचा मास्टरमाइंड फारुकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Cybercriminals' call center racket in Chhatrapati Sambhajinagar: Contact for anti-national activities under the guise of fraud | सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क

सायबर गुन्हेगारांचे कॉल सेंटरचे रॅकेट: फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी संपर्क

छत्रपती संभाजीनगर : विदेशी नागरिकांना विविध प्रकारे जाळ्यात अडकवून कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमध्ये फसवणुकीच्या आडून देशविघातकी कृत्यासाठी, आर्थिक व्यवहार केल्याचा संशय तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना आहे. येथून रोज शेकडो आंतरराष्ट्रीय कॉल करून क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार होत होते. शिवाय, आरोपींच्या लॅपटॉपमध्ये विदेशी उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी, न्यायालयाच्या आदेशाचे बनावटीकरण केलेले कागदपत्रही आढळले. केंद्रीय तपास यंत्रणांना बगल देत होत असलेले हे कॉल व व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या हायटेक तंत्रज्ञानाचा, विदेशी कागदपत्रांचा देशविघातक कृत्यासाठी देखील वापर केला जात असावा, असा दाट संशय व्यक्त झाल्याने आता गुप्तचर यंत्रणांकडून समांतर तपास सुरू करण्यात आला आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील आयटी पार्कमध्ये आयआरएस इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट नावाने सायबर गुन्हेगारांनी कॉल सेंटर उघडले होते. या कॉल सेंटरमध्ये केवळ कर व बँक व्यवहारांच्या माहितीच्या आधारे अमेरिका व अन्य देशांतील नागरिकांना कधी धमकावून तर कधी बक्षीस, दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळले जात होते. यात भावेश प्रकाश चौधरी (३४), भाविक शिवदेव पटेल (२७), सतीश शंकर लाडे (३५), वलय पराग व्यास (३३), (सर्व रा. अहमदाबाद, गुजरात), अजय ठाकूर आणि मनवर्धन राठोड यांना अटक करण्यात आली. त्यांचा म्होरक्या मास्टरमाइंड आरोपी अब्दुल फारुक मुकदम शाह ऊर्फ फारुकी याला गोव्यातून अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने अब्दुल फारुकला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. १५ मिनिटे सरकारी पक्ष व आरोपी वकिलांमध्ये युक्तिवाद चालला. त्यानंतर न्यायालयाने फारुकला ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या मुद्द्यांवर होईल पुढील तपास
-अटकेतील अन्य सहा व फारुकची समोरासमोर चौकशी केली जाईल. ते एकमेकांच्या संपर्कात कसे आले, त्यांना कशा प्रकारे, कुठे प्रशिक्षित केले गेले ?
-आतापर्यंत लाखो डॉलर्सची विल्हेवाट कशा प्रकारे लावली? विदेशी नागरिकांचा डेटा कशा प्रकारे चोरी केला?
-विदेशातील उच्चपदस्थ अधिकारी, न्यायालयाच्या आदेशाच्या कॉपी कशा मिळवल्या ? त्याचा उद्देश काय ?
-जॉन नामक व्यक्तीचा केवळ आयडी मिळाला आहे. त्या नावाने खरंच व्यक्ती आहे की, विदेशातील प्रस्थापित देशविरोधी शक्ती हे रॅकेट चालवत आहे, याचा तपास होणार.

विदेशी तपास यंत्रणा देणार माहिती
या कारवाईच्या तपासावर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दखल घेतली जात आहे. विदेशी तपास यंत्रणांनी फसवणुकीच्या प्रकरणांच्या माहितीची पोलिस महासंचालक कार्यालयाला माहिती दिली आहे. त्यातील तथ्य व पुराव्यांची या कॉल सेंटरमध्ये प्राप्त माहितीसोबत खातरजमा केली जाणार आहे. तसा मेल शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलिस आयुक्तांकडून फारुकची तीन तास चौकशी
देशविरोधी कृत्यासह आंतरराष्ट्रीय संबंध आल्याने पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सातत्याने तपासाचा पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मास्टरमाइंड फारुक पकडला जाताच पोलिस आयुक्त (प्रभारी) सुधीर हिरेमठ यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सकाळी १०:३० ते १:३० असे तीन तास कसून चौकशी केली.

रायपूरनंतर फारुकला हवाल्यामार्फत मिळायची आर्थिक रसद
-छत्रपती संभाजीनगरपूर्वी रायपूरमध्ये ही कंपनी सुरू होती. मात्र, पोलिसांपर्यंत माहिती गेल्याची कुणकुण लागताच कंपनी थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवण्यात आली. त्यात कंपनीतील साहित्यासह कर्मचाऱ्यांना नेणे, त्यांच्या राहण्याची, जेवणाची, कंपनीसाठी जागा, फर्निचरचा सगळ्या खर्चाची जबाबदारी फारुकवर होती.
-फारुकने ती यशस्वीरीत्या पार पाडली. त्यानंतर त्याला थेट गुजरात, उत्तर प्रदेश, दिल्लीवरून रोख रक्कम पुरवली जात होती. ज्याद्वारे तो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन खर्च व अन्य नियोजन पार पाडायचा. ही रोख हवाल्यामार्फत पाठवली जात होती. पोलिस आता या पैशांचा व्यवहार करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

Web Title : साइबर अपराधियों का कॉल सेंटर रैकेट: राष्ट्रविरोधी गतिविधियों के लिए धोखाधड़ी

Web Summary : संभाजीनगर में एक अंतरराष्ट्रीय कॉल सेंटर ने विदेशियों को धोखा दिया, जिससे राष्ट्रविरोधी वित्तीय व्यवहार का संदेह पैदा हुआ। अधिकारियों को प्रौद्योगिकी और दस्तावेजों के दुरुपयोग का संदेह है। मास्टरमाइंड फारूक गिरफ्तार; डेटा चोरी और विदेशी संबंधों की जांच जारी।

Web Title : Cybercriminals' Call Center Racket: Fraudulent Calls for Anti-National Activities

Web Summary : An international call center in Sambhajinagar defrauded foreigners, raising suspicions of anti-national financial dealings. Authorities suspect misuse of technology and documents. Mastermind Faruk arrested; investigation ongoing into data theft and foreign connections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.