सायबर गुन्हेगारांनी थेट सीमकार्ड केले ब्लॉक; चोवीस तासांत ३ लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:25 IST2025-02-20T13:20:09+5:302025-02-20T13:25:01+5:30
सीम कंपनीने सीमकार्ड करप्ट झाल्याचे कारण दिले. मात्र, ते कसे झाले, कशामुळे याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही.

सायबर गुन्हेगारांनी थेट सीमकार्ड केले ब्लॉक; चोवीस तासांत ३ लाख लंपास
छत्रपती संभाजीनगर : फसवण्याचे जाळे टाकूनही व्यक्ती त्यात अडकत नसल्याने सायबर गुन्हेगारांनी त्याचे थेट सीमकार्ड ब्लॉक करून चोवीस तासांत ३ लाख २४ हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे, सायबर पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनी या प्रकरणी क्रांती चौक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
खेळाडूंच्या कपड्यांची निर्मितीचा व्यवसाय असलेल्या राकेश गुराल्ले यांना काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने कॉलद्वारे संपर्क साधला. हिंदी भाषेतून 'तुमचे नवे क्रेडिट कार्ड आले आहे' असे सांगत पॅन क्रमांकाची मागणी केली. राकेश यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते केदारनाथला जाण्यासाठी निघाले असता त्यांचे सीमकार्ड बंद पडले होते. दिल्ली येथे पोहोचल्यावर त्यांनी त्याच क्रमांकाचे नवे सीमकार्ड घेऊन सुरू केले. मात्र, त्यांना अचानक त्यांच्या व्यावसायिक बँक खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी १९३० या हेल्पलाईनवर तक्रार केली. युपीआयडी बंद होऊनही काही दिवसांत त्यांच्या व्यवसायाच्या खात्यातून पुन्हा वेळोवेळी १ लाख ६४ हजार रुपये विश्वजित मंडल नामक व्यक्तीच्या बँक खात्यावर वळते होत गेले.
कारण मात्र निष्पन्नच नाही
सीम कंपनीने सीमकार्ड करप्ट झाल्याचे कारण दिले. मात्र, ते कसे झाले, कशामुळे याबाबत चित्र स्पष्ट झाले नाही. राकेश यांनी ऑनलाईनसह जून, २०२४ मध्ये आयुक्तालयातील सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांनी तपासाचे कारण देत सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी क्रांती चौक पोलिसांकडे अर्ज वर्ग केला. मात्र, त्यातही कुठले फसवणुकीचा ठोस कारण, प्रकार स्पष्ट केला गेला नाही.