ग्राहकाने ऑर्डर दिली, फ्रीजला हात लावताच हॉटेल चालकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:14 IST2023-06-16T17:14:07+5:302023-06-16T17:14:29+5:30
फ्रीजमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने जोरदार धक्का बसल्याने झाला मृत्यू

ग्राहकाने ऑर्डर दिली, फ्रीजला हात लावताच हॉटेल चालकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू
वैजापूर: फ्रीजमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने जोरदार धक्का बसल्याने एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये बुधवार रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. विष्णू किशोर पानसरे (रा. चोर वाघलगाव) असे या घटनेतील मयत युवकाचे नाव आहे.
चोर वाघलगाव येथे गंगापूर रोडवर विष्णू पानसरे याचे सद्गुरु फरसाण नावाने हॉटेल आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलवर ग्राहक आल्यानंतर विष्णू पानसरे हा फ्रीजमधून साहित्य काढण्यासाठी गेला. यावेळी फ्रीजमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. विष्णूने फ्रीजला हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. उपस्थितांनी त्याला तात्काळ उपचाराकरिता वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकारणी वीरगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.