मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; लखन-सर्जा जोडीने सांगलील शंकरपटाचे मैदान मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 16:33 IST2025-11-12T16:32:59+5:302025-11-12T16:33:40+5:30
सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत लखन आणि सर्जाने पहिला क्रमांक पटकावला.

मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; लखन-सर्जा जोडीने सांगलील शंकरपटाचे मैदान मारले
Lakhan-Sarja Bull won : सांगली येथे हिंदकेसरी कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यातील लखन-सर्जा या जोडीने पहिला क्रमांक पटकावत मराठवाड्याची मान उंचावली. या स्पर्धेत तब्बल 1,210 बैल जोड्या सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना मागे टाकत लखन-सर्जाने शंकरपट स्पर्धेचे मैदान मारले.
वाऱ्याच्या वेगाने धावत लखन आणि सर्जा या जोडीने सर्व प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. या विजयानंतर बैलाच्या मालकाला फॉर्च्युनर कार, मानाची चांदीची गदा आणि दुचाकी असे आकर्षक बक्षीस मिळाले. या स्पर्धेत लखन-सर्जाच्या जोडीला यश मिळवून देण्यासाठी किशोर कदम यांनी अप्रतिम कौशल्य दाखवले.
करोडी गावचा ‘ट्रिपल केसरी’ बैल लखन
लखन हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील करोडी गावचा असून, मनोहर चव्हाण यांच्या मालकीचा आहे. तीन वर्षांपूर्वी चव्हाण बंधूंनी लखनला जालना जिल्ह्यातील केरळा गावातील गजानन काळे यांच्याकडून तब्बल ₹11 लाख 51 हजार रुपयांना विकत घेतले होते. त्यानंतर लाखो रुपये खर्च करून त्याला शर्यतीसाठी खास प्रशिक्षण दिले. लखन हा देशातील सर्वाधिक अंतर प्रवास करणारा ‘ट्रिपल केसरी’ बैल मानला जातो. त्याने आतापर्यंत 110 हून अधिक बक्षिसे आणि 15 दुचाकी जिंकल्या आहेत.
लखनचा रोजचा खुराक
दररोज सकाळ, संध्याकाळी पाच-पाच गावरान अंडी, तसेच 5 लिटर गीर गायीचे दूध, गव्हाचे पीठ, काजू बदाम, दोन ते तीन प्रकारच्या डाळी असा खुराक आहे. लखनासाठी वेगळा गोठा असून त्याला राज्य, परराज्यात स्पर्धांसाठी नेण्यासाठी एक पिकअप गाडी आहे. त्याने आतापर्यंत 1 लाख कि.मी. पेक्षाही जास्त अंतर प्रवास केला आहे.
हिंगोलीचा सर्जा
दरम्यान, दुर्गम भागातून आलेल्या सर्जाच्या या यशामुळे हिंगोली जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण असून, ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पारंपरिक बैलसंस्कृतीचा जयघोष झाला आहे. सर्जा ने यापूर्वी तीन वेळा विविध ठिकाणी हिंदकेसरी म्हणून मान मिळवला आहे. एका वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातून साईनाथ कऱ्हाळे यांनी या बैलाला शंकरपटासाठी खरेदी केले आणि त्याचे संगोपन करुन जोरदार तयारी करत राज्यभरामध्ये अनेक बक्षिसे मिळविली आहेत. दांडेगाव सह हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यामुळे साईनाथ कऱ्हाळे आणि त्यांच्या सर्जाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.