गंभीर! छत्रपती संभाजीनगरात आठच दिवसांत २९ दुचाकी चोरी, १५ घरफोड्या, १२ जणांना लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:00 IST2025-05-09T17:56:11+5:302025-05-09T18:00:01+5:30
गुन्हेगारी थोपविण्यात शहर पोलिसांना अपयश; तोतया पोलिस व चोरांचीच शहरात चलती

गंभीर! छत्रपती संभाजीनगरात आठच दिवसांत २९ दुचाकी चोरी, १५ घरफोड्या, १२ जणांना लुटले
छत्रपती संभाजीनगर : गेल्या चार महिन्यांपासून शहरात सुरू असलेले चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीचे सत्र मे महिन्यांतही थांबलेले नाही. मे महिन्याच्या अवघ्या आठ दिवसांत शहरात २९ दुचाकी चोरीसह १५ घरफोड्या व १२ नागरिकांना लुटण्यात आले. एकीकडे नागरिकांना राजरोस लुटले जात आहे. गुन्हेगारी थोपविण्यात शहर पोलिसांना अपयश येत आहे. विभागाची एकूण भूमिका आणि कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह लागले आहे.
घरफोड्या, दुचाकी चोरींपेक्षाही दुचाकीस्वार लुटारूंनी शहरात हैदोस घातला आहे. पायी चालणाऱ्या वृद्ध, महिला, तरुणींना सहज लक्ष्य केले जात आहे. मंगळवारी रात्री अवघ्या १० मिनिटांत त्रिमूर्ती चौक ते सूतगिरणी चौक अशा २ किलोमीटर अंतरावर दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. त्रिमूर्ती चौकात राहणाऱ्या सविता गायकवाड (४५) ६ मे रोजी रात्री परिसरात पायी फिरत होत्या. यावेळी मागून आलेल्या दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील १ तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पोबारा केला. तर दुसऱ्या घटनेत शिल्पा आष्टेकर (५०, रा. नाथ प्रांगण) या कुटुंबासह १० वाजेच्या सुमारास सूतगिरणी चौकात आइस्क्रीम खाण्यास जात असताना दुचाकीस्वारांनी एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अनुक्रमे जवाहरनगर, पुंडलिकनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
भरदिवसा घरफोड्यांचे सत्र
७ मे रोजी भरदिवसा चोरांनी तीन ठिकाणी घरे फोडली. पडेगावमध्ये राहणारे रामनाथ जाधव हे नोकरीवर गेले असताना सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान चोरांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा, स्टीलचे लॉक तोडून ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले. शालिनी नायर (रा. शहानूरमियाँ दर्गा चौक) यांच्या घरातून चोरांनी सकाळी ९:३० ते दुपारी २ वाजेदरम्यान १० हजार रोख, तोळाभर सोने लंपास केले. वाळुजमध्ये गणेश म्हसरूप यांच्या घरातून चोरांनी तासाभरात तोळाभर सोने व अडीच हजार चोरून नेले.
मेच्या ८ दिवसांचे आकडे चिंताजनक
प्रकार - संख्या
दुचाकी चोरी - २९
लुटमार - १२
घरफोडी, चोरी - १५
ठराविक ठाण्यांच्या हद्दीत प्रमाण अधिक
शहरातील ठराविक पोलिस ठाण्यांच्या हद्दीत लुटमार, चोऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात प्रामुख्याने जवाहरनगर हद्दीत शहरात सर्वाधिक सोनसाखळी चोरी, तोतया पोलिसांचा वावर असतो. त्यानंतर पुंडलिकनगर, एमआयडीसी वाळुज, वाळुज, क्रांती चौक, एमआयडीसी सिडको, उस्मानपुरा, सातारा ठाण्याच्या हद्दीत सातत्याने नागरिकांना लुटले जात आहे. मात्र, तरीही स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून यासाठी कोणतेही ठोस निर्णय वा मोहिमा आखल्या गेल्या नाहीत.