‘मकोका’त जामिनावर सुटताच गुन्हेगारांचा मुकुंदवाडीत हैदोस; १० दिवसांत दोघांवर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:10 IST2025-09-04T17:05:42+5:302025-09-04T17:10:01+5:30

मुकुंदवाडी गँगवाल्यांच्या हवाली करून पोलिस यंत्रणा नामानिराळीच

Criminals go on a rampage in Mukundwadi after being released on bail under MCOCA; Two people were fatally attacked in 10 days | ‘मकोका’त जामिनावर सुटताच गुन्हेगारांचा मुकुंदवाडीत हैदोस; १० दिवसांत दोघांवर जीवघेणा हल्ला

‘मकोका’त जामिनावर सुटताच गुन्हेगारांचा मुकुंदवाडीत हैदोस; १० दिवसांत दोघांवर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर : ‘मकोका’सारख्या गंभीर कारवाईनंतर नुकत्याच जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांच्या टोळीने पुन्हा एकदा उच्छाद मांडणे सुरू केले आहे. एका तडीपार गुन्हेगाराने पोलिसालाच मारहाण केली. तर १९ वर्षीय तरुणाला रक्तबंबाळ करून लुटले. या दोन घटना ताज्या असताना १७ गंभीर गुन्ह्यांत आरोपी असलेल्या मुकेश महेंद्र साळवे याने मुकुंदवाडीत मंगळवारी एका तरुणावर दीड फूट लांब चाकूने हल्ला केला. त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी त्याने एका इलेक्ट्रिशियनवर हल्लाही केला होता. मात्र, त्यात गुन्हा दाखल झाला नाही.

बाळू मकळे (२८, रा. मुकुंदनगर) हा २ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता घरासमोर खेळत होता. मुकेशने तेथे जात अचानक बाळूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत ‘मी आताच मकोका लागल्यानंतर बाहेर आलो आहे, मी मुकुंदवाडीचा दादा आहे, माझे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत मारहाण केली. ‘तू मला का भिडतो,’ असे म्हणत कंबरेला लावलेला अंदाजे दीड ते दोन फूट लांब धारदार चाकूने घाव घालून बाळूवर हल्ला केला. रुग्णालयात उपचार घेऊन बाळूने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुकेशवर गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला २ दिवस पोलिस कोठडी सुनावल्याचे वायाळ यांनी सांगितले.

तीन दिवसांपूर्वी टोळी समोरासमोर, एका तरुणावरही प्राणघातक हल्ला
- मार्च महिन्यात विकी ऊर्फ हेल्मेट सोनकांबळे (३३), मुकेश ऊर्फ मुक्या साळवे (२७), बालाजी पिवळ (३२), किशोर शिंदे, उमेश गवळी, रोहित म्हस्के, अजय ऊर्फ आज्या आदमाने, सुंदरू कांबळे, संकेत लांबदांडे यांनी व्यापाऱ्याला खंडणी मागत प्राणघातक हल्ला केला. हवेत गोळीबारही केला होता. त्यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करत अटकही झाली. मात्र, ऑगस्टमध्ये हेल्मेट वगळता सर्व आरोपी जामिनावर सुटले.
- बाहेर येताच त्यांनी मुकुंदवाडीत उच्छाद मांडला. तीन दिवसांपूर्वी गुन्हेगारांच्या २ टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
- ६ दिवसांपूर्वी मुकेशने लोखंडे नामक इलेक्ट्रिशियनवर प्राणघातक हल्ला केला. त्याला जवळपास ८ टाके पडले. मात्र, पोलिसांकडे तक्रार न देण्यासाठी या टोळीने त्याला रुग्णालयात जाऊन धमकावले. परिणामी, त्यात गुन्हाच दाखल झाला नाही.

तिघांचे मिळून १०८ गुन्हे
विकी, मुकेश व बालाजी या तीन गुन्हेगारांवर एकूण गंभीर स्वरूपाचे १०८ गुन्हे आहेत. त्यात विकी, बालाजीवर प्रत्येकी ४६ तर मुकेशवर १६ गुन्हे आहेत. तरीही मुकुंदवाडी पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर हे राजरोस गुंडगिरी, हप्ते, खंडणी मागत फिरतात. त्यामुळे मुकुंदवाडीतील काही ठरावीक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सायबर पोलिस करतात काय?
या सर्व टोळ्यांकडून अजूनही नशा करताना, शस्त्रांसह सोशल मीडियावर राजरोस स्टेटस ठेवले जात आहे. पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी काही दिवसांपूर्वी सायबर पोलिसांना याबाबत कारवाईचे आदेश दिले होते. सायबर पोलिसांकडून मात्र उपायुक्तांच्याच आदेशाला फाटा दिला आहे.

Web Title: Criminals go on a rampage in Mukundwadi after being released on bail under MCOCA; Two people were fatally attacked in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.