विनापरवाना ड्रोन उडवणे महागात पडले; चार छायाचित्रकारांवर गुन्हे दाखल, ड्रोनही केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 15:15 IST2024-09-12T15:14:16+5:302024-09-12T15:15:17+5:30
दौलताबाद किल्ला, हज हाऊस, मकबरा परिसरात चित्रिकरण

विनापरवाना ड्रोन उडवणे महागात पडले; चार छायाचित्रकारांवर गुन्हे दाखल, ड्रोनही केले जप्त
छत्रपती संभाजीनगर : विनापरवाना आकाशात ड्रोन उडवून चित्रिकरणाची हौस चार छायाचित्रकारांना चांगलीच महागात पडली. पोलिस आयुक्तांचे आदेश भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन ड्रोन जप्त करण्यात आले.
मोहम्मद मुस्तफा शरीफ (२९, रा. औरंगपुरा), मोहम्मद मोईनोद्दीन मोहम्मद इरफान (१८, रा. यशोधरा कॉलनी), शेख मुद्दसीर शेख रज्जाक व खान रेहान इरफान (२५, रा. कैसर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. चौघांवर बीएनएस ड्रोन अधिनियम २०२१, वायुमान अधिनियम १९३४ कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यातील रेहानने दौलताबाद किल्ला व हज हाऊस परिसरात ड्रोन उडवून चित्रिकरण केले. मुस्तफाने बीबी का मकबरा व सोनेरी महल, तर मोईनोद्दीनने बीबी का मकबरा परिसरात ड्रोन उडवून चित्रिकरण केल्याचे पोलिसांनी सांगितले. उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या सूचनेवरुन निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक कदीर देशमुख, उपनिरीक्षक कैलास अन्नलदास, अंमलदार राहुल काळे, अल्ताफ पठाण यांनी ही कारवाई केली.
ड्रोनची नोंदणी केली का ?
काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरातील ड्रोन चालक, प्री वेडिंग व्यावसायिक, शुटिंग व्यावसायिक छायाचित्रकारांची बैठक घेऊन येलो झोन, रेड झोन भागात नियमानुसार ड्रोनचे रजिस्ट्रेशन करणे, ड्रोन उडवण्यापूर्वी संबंधित यंत्रणेची पूर्वपरवानगी घेण्याची सूचना केली होती. शहरातील काही भाग हा ड्रोन प्रतिबंधात्मक क्षेत्रात आहे. अतीमहत्वाचे ठिकाणे, पर्यटन स्थळ, प्रेक्षणीय स्थळावर ड्रोन उडवण्यास मनाई आहे. शिवाय, २३ ऑगस्ट रोजी त्यांनी विनापरवाना ड्रोन उडवण्यास बंदी आदेश जारी केले होते.