विना परवाना खत विक्री प्रकरणी गुजरात व यूपीच्या कंपनीवर गुन्हा, तिघे पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:10 IST2025-05-19T15:09:46+5:302025-05-19T15:10:07+5:30

कृषी विभागाच्या भरारी पथकाची पाचोड येथे कारवाई, तिघे पोलिसांच्या ताब्यात

Crime against Gujarat and UP companies in case of selling fertilizer without license, three in police custody | विना परवाना खत विक्री प्रकरणी गुजरात व यूपीच्या कंपनीवर गुन्हा, तिघे पोलिसांच्या ताब्यात

विना परवाना खत विक्री प्रकरणी गुजरात व यूपीच्या कंपनीवर गुन्हा, तिघे पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : विना परवाना शेतकऱ्यांना रासायनिक खत विक्री करणाऱ्या गुजरातमधील कंपनीच्या डिलर आणि विक्री प्रतिनिधींविरोधात कृषी विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी कारवाई केली. या कारवाईत गुजरात आणि उत्तर प्रदेशातील खत कंपन्यांवर आणि त्यांच्या प्रतिनिधींवर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. खताच्या २० गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. पूर्वी क्रॉप इंडिया (निजामपूर, ता. साक्री, जि. धुळे), सुप्रीम कामधेनू फर्टिलायझर कंपनी (गुजरात) या कंपन्यांचे स्थानिक प्रतिनिधी धर्मेंद्र विश्वकर्मा, रमाकांत विश्वकर्मा आणि इंद्रजित यादव अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या कारवाईविषयी प्राप्त माहिती अशी की, पैठण तालुक्यातील कडेठाण खुर्द येथे स्वस्त रासायनिक खत विक्री होत असल्याची गुप्त माहिती विभागीय गुणनियंत्रण अधिकारी आशिष काळुशे यांना मिळाली. यानंतर भरारी पथकाचे अधिकारी पंकज ताजने, मोहीम अधिकारी संतोष जाधव यांच्या पथकाने कडेठाण येथे जाऊन अधिक माहिती घेतली. रमाकांत विश्वकर्मा आणि इंद्रजित यादव (दोघे रा. उत्तर प्रदेश) यांनी पॉम्पलेट दाखवून तसेच १०:२६:२६ या खताला पर्यायी आणि स्वस्त खत असल्याचे पटवून दिले. तसेच शेतकऱ्यांना २० गोण्या खत विक्री केल्याचे आढळून आले. शेतकऱ्यांकडे बाकी राहिलेले खताचे पैसे घेण्यासाठी ते आले होते. त्याचवेळी पथकाने त्यांना खताचे बिल, विक्री परवाना दाखविण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती.

मात्र, कंपनी प्रतिनिधी धर्मेंद्र विश्वकर्मा यांनी हे खत विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर काळुशे यांनी धर्मेंद्र यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून विक्री परवान्याची प्रत प्राप्त केली. यात कॅरिअर बेस्ड कॉन्सरशिया या खताचा समावेश असल्याचे आढळून आले. परवानाधारक विलास सोनवणे आणि धर्मेंद्र यांच्याकडे याविषयी विचारणा केल्यानंतर त्यांनी बिलबुक उपलब्ध करवून दिले नाही. चौकशीअंती ही कंपनी विना परवाना खत विक्री करीत असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी खताच्या गोण्यांची तपासणी केली असता ते कॅरिअर बेस्ड कॉन्सरशिया आणि बायो फर्टिलायझर असल्याचे निदर्शनास आले. शिवाय गोण्यांवर खत एक्सपायरी दिनांक नमूद नाही. हे खत गुजरातमधील सुप्रिम कामधेनू कंपनीने तयार केले आहे. पूर्वी क्रॉप इंडिया निजामपूर (ता. साक्री, जि. धुळे) हे त्यांचे अधिकृत विक्रेता असल्याचे निदर्शनास आले.

Web Title: Crime against Gujarat and UP companies in case of selling fertilizer without license, three in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.