रिक्षाचालकाची हिंमत, पोलिसाला म्हणतो 'छुटने के बाद तेरे को घाव से मारुंगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 19:22 IST2024-05-13T19:20:48+5:302024-05-13T19:22:04+5:30

टी. व्ही. चौकात वाद घालणाऱ्यांना ताब्यात घेताना प्रकार

Courage of Rickshaw Driver, Tells Police 'Chutne Ke Baad Tere Ko Ghav Se Marunga' | रिक्षाचालकाची हिंमत, पोलिसाला म्हणतो 'छुटने के बाद तेरे को घाव से मारुंगा'

रिक्षाचालकाची हिंमत, पोलिसाला म्हणतो 'छुटने के बाद तेरे को घाव से मारुंगा'

छत्रपती संभाजीनगर : टी.व्ही. सेंटर चौकातील मोकळ्या मैदानात धिंगाणा घालणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की करून गणवेश फाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केल्यावर मात्र त्यातील एकाने पोलिसांनाच ''''छुटने के बाद तेरे को घाव से मारुंगा'''' अशी धमकी दिली. सलमान अमजत पठाण (२४), आकाश रामदास शिंदे (२८), शेख असलम शेख अदील अशी त्यांचे नावे असून, सिडको पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता सदर ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरड करून पाच ते सहा जण मारहाण करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. अंमलदार सुरेश वाकळे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली. आरोपींना समजून सांगत ठाण्यात चालण्यास सांगताच त्यांनी पोलिसांसोबत झटापट केली. वाकळे यांचा शर्ट पकडून लाईनयार्डची दाेरी तोडली. वाकळे यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत त्यांना रिक्षात बसवून ठाण्यात नेले. तेथे मात्र आरोपीने पोलिसांवरच धारदार शस्त्राने हल्ला करण्याची धमकी दिली. तिन्ही आरोपी रिक्षाचालक आहेत. सहायक निरीक्षक योगेश गायकवाड यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्यांची हर्सुल कारागृहात रवानगी केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Courage of Rickshaw Driver, Tells Police 'Chutne Ke Baad Tere Ko Ghav Se Marunga'