भरधाव कारने दांपत्याला चिरडले; ३ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 17:43 IST2020-09-04T17:37:37+5:302020-09-04T17:43:32+5:30
हा अपघात एवढा भीषण होता की दांपत्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाले.

भरधाव कारने दांपत्याला चिरडले; ३ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी
औरंगाबाद: नातेवाईकांना भेटून वडगांवकोल्हाटी येथे तीन वर्षीय चिमुकल्यासह जाणाऱ्या दुचाकीस्वार दांपत्याला भरधाव कारने चिरडले. या घटनेत पती पत्नी जागीच ठार झाले तर त्यांचा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला . हा अपघात ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नगरनाका ते छावणी उड्डाणपूलदरम्यान झाला. अमोल रामधन हेरोडे आणि प्रियंका अमोल हेरोडे ( दोघे रा. वडगांव कोल्हाटी , मूळ रा. खामगांव, जिल्हा बुलढाणा) अशी मयताची नावे आहेत. तर उत्कर्ष (३वर्ष ) असे जखमीचे नाव आहे.
या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, हेरोडे दांपत्य मूळचे पोरज, ता. खामगाव, बुलढाणा येथील रहिवासी आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील खाजगी कंपनीत अमोल नोकरी करीत होते. गुरुवारी अनिल हे पत्नी प्रियंका आणि मुलगा उत्कर्षसह मोटारसायकलवर शहरात राहणाऱ्या मामे सासऱ्याच्या घरी भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हेरोडे दांपत्य आणि उत्कर्षला घेऊन वडगांव कोल्हाटी येथे दुचाकीने जात होते. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास नगरनाका ते छावणी उड्डाणपूलदरम्यान ते असतांना मागून आलेल्या तवेरा कारने त्यांना जोराची धडक देऊन फरपटत नेले.
हा अपघात एवढा भीषण होता की हेरोडे दांपत्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाले. तर दूर फेकल्या गेलेल्या उत्कर्षच्या हाताला फ्रक्चर झाले आणि तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी मयत अमोल आणि प्रियंका आणि जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले.