coronavirus : थुंकीचे पाट, आता बास..! नागरिकांनी स्वच्छतेबाबत पाळावी स्वयंशिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 16:17 IST2020-03-18T16:15:10+5:302020-03-18T16:17:52+5:30
कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंशिस्तीने स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.

coronavirus : थुंकीचे पाट, आता बास..! नागरिकांनी स्वच्छतेबाबत पाळावी स्वयंशिस्त
औरंगाबाद : रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे कोणत्याही साथीच्या आजाराचे उगमस्थान. नेमके त्याकडे सर्व संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकण्याच्या सवयीकडे सामाजिक गुन्हा म्हणून पाहण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे. कोरोनासारख्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वयंशिस्तीने स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
महापालिका वगळता कोणतीही सरकारी यंत्रणा याकडे गंभीरपणे पाहायला तयार नाही. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात मनुष्यबळ कमी पडत असल्याने पालिकेच्या या कामाला मर्यादा पडतात. रस्त्यावर असणारे वाहतूक शाखेचे पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत सरकारने विशेष अधिकार देऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तीचा जागेवर पंचनामा वगैरे करून दंड करण्याची यंत्रणा निर्माण करावी, असे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे नागरिकांनीच या गंभीर विषयात स्वयंशिस्त लावून घेण्याची गरज आहे. एरवी अनेक विषयांवर कंठकोष करणाऱ्या स्वयंसेवी संस्था यावर मात्र बोलत नाहीत. वास्तविक सर्वांनी एकत्रितपणे ठरवले तर प्रबोधन, दंड, कारवाई, शिस्त यातून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या सवयीला आळा घालणे सहज शक्य आहे. तशी इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे. त्यातून कोरोनाच काय; पण कोणत्याही साथीच्या आजाराचा प्रतिबंध करता येईल.
नेमके होते काय ?
- पान, गुटखा, मावा या गोष्टींचे सेवन केले की, काही वेळाने थुंकावेच लागते.
- गाडी असेल तर गाडीवरूनच मान वाकडी करून थुंकले जाते.
- पायी जात असल्यास रस्त्याच्या कडेला थुंकले जाते.
- पानटपरीच्या परिसरात तर दिवसभरात हजारो पिंका टाकल्या जातात.
- काहीही खाण्याची सवय नसली तरीही काही जणांना थुंकल्याशिवाय चैन पडत नाही. असे लोक कुठेही थुंकतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो.
थुंकल्यामुळे काय होते?
- आजारी व्यक्तीच्या थुंकीतील आजार पसरवणारे जंतू मोकळे होतात.
- संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वासावाटे ते त्याच्या शरीरात जातात.
- ही प्रक्रिया एका नाही तर अनेक व्यक्तींच्या बाबतीत होते.
- प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, आधीच आजारी असलेल्या व्यक्तींवर याचा परिणाम लगेच होतो.
- जिथे थुंकले त्या परिसरातील धातू किंवा कोणत्याही वस्तूवर जंतू बसतात.
- त्याला कोणाचाही हात लागला की, ते लगेच कार्यान्वित होतात.
- थंड वातावरण, सावली, पाणी अशा गोष्टी जंतूंना जिवंत ठेवतात.
काय करायला हवे...
- थुंकताना कोणीही दिसले की, पाहणारे त्याला प्रतिबंध करू शकतात.
- थुंकणारा एकच असतो. पाहणारे अनेक, त्यामुळे प्रतिबंध करणे शक्य आहे.
- रस्त्यावर थुंकणाऱ्यांना जागेवर आर्थिक किंवा शिक्षेच्या स्वरूपात दंड करणारी यंत्रणा निर्माण करणे.
- कारवाईच्या मागे कायद्याचे पाठबळ निर्माण करणे.
- सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी प्रबोधन करणे.
शहरासाठी केवळ नऊ नागरी मित्र
शहरात जागोजागी पिंका मारणाऱ्यांची कमतरता नाही. महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून माजी सैनिकांची नऊ पथके नागरी मित्र म्हणून नऊ झोनमध्ये काम करतात. त्यांच्याकडून मार्गावर घाण करणाऱ्याला दीडशे रुपये, हॉटेल दुकानांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास पाचशे रुपये, मोठ्या प्रमाणात कचरा रस्त्यावर टाकल्यास पाच हजार रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास शंभर, तर उघड्यावर शौच केल्यास पाचशे रुपयांचा दंड करण्यात येतो. शिवाय थुंकताना आढळल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात येईल, असे फलक महापालिकेत लावण्यात आलेले आहेत. मात्र, आतापर्यंत किती लोकांवर कारवाई केली याबद्दल महापालिका प्रशासन निरुत्तर आहे.
दंड करण्याचा अधिकार
राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एक अध्यादेश जारी करून त्यांना रस्त्यावर किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा घाण करणे यासाठी दंड करण्याचा अधिकार दिला आहे. त्याच आधारे महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१८ पासून कारवाईला सुरुवात केली. मात्र, मनुष्यबळाअभावी ती नामधारीच सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण औरंगाबादेत सापडले आहेत. तरीही या कारवाईला महापालिकेकडून बळ देण्यात आलेले नाही.
शहरातून साठ लाखांचा दंड वसूल
आॅक्टोबर २०१८ पासून सुरू कारवाई थंडावली होती. सरासरी दोनशे ते तीनशे लोकांवर कारवाई केली जात होती. डिसेंबर २०१९ मध्ये कारवाईने जोर धरला तेव्हा ३९४ जणांकडून तीन लाख ३४ हजार १०० रुपयांचा दंड वसूल झाला. जानेवारीत २२६ जणांकडून एक लाख ८० हजार १०० रुपये, तर फेब्रुवारीत २३३ जणांकडून दोन लाख ४९ हजार ७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
६,३०० जणांवर कारवाई
महापालिकेने कारवाई सुरू झाल्यापासून आजपर्यंत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या ६,३०० लोकांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये किती थुंकणाऱ्यांवर कारवाई केली याबद्दलचे वर्गीकरण नाही. बहुतांश कारवाया या कचरा रस्त्यात टाकणाऱ्यांसंबंधीच्या आहेत. कारवाईचे अधिकार आरोग्य निरीक्षकांनाही देण्यात आल्याचे घनकचरा व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले.
थुंकणाऱ्यांना कायदा दाखवू
सध्या कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना महापालिका करते आहे. शिंकणे, खोकलण्यातून जसा विषाणू संक्रमणाचा धोका आहे, तसाच तो थुंकण्यामुळेही आहेच. घनकचरा विभागास सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कायद्याने दंड वसुलीचा अधिकार आहे. त्यामुळे त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. थुंकणाऱ्यांकडून दंड वसूल करू. शिवाय जनजागृतीवरही भर दिला जाईल.
-सुमंत मोरे, उपायुक्त महापालिका, औरंगाबाद
रुमाल धरण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. आपल्याकडे कायदा असताना त्याची अंमलबजावणी होत नाही. सार्वजनिक आरोग्यासाठी रस्त्यावर थुंकणे टाळून शिंकताना, खोकलताना तोंडासमोर रुमाल धरण्याची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने अधिक दक्ष राहून आपल्या तोंडातील जीवजंतू इतरत्र पसरणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. या काळात लहान मुलांचे अनावश्यक बाहेर पडणेही टाळणे गरजेचे आहे.
-डॉ. राजेंद्र गांधी, उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र