coronavirus news : रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:27 IST2020-05-26T18:26:25+5:302020-05-26T18:27:10+5:30
मनपाच्या शाळा सॅनिटाईज करण्याच्या सूचना

coronavirus news : रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू होण्याचे संकेत
औरंगाबाद : रेड झोन वगळता उर्वरित भागांतील शाळा वेळेवरच उघडण्याचे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाकडून केले जात आहे. रेड झोनमध्ये असलेल्या औरंगाबादसह इतर ठिकाणी मात्र दुसऱ्या टप्प्यांत शाळा सुरू करण्याचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यादृष्टीने औरंगाबाद महानगरपालिकेनेही तयारी सुरू केली आहे.
राज्यात दरवर्षी १५ जूनपासून नवीन शैक्षिणक सत्र सुरू होते. ‘कोरोना’मुळे यंदा शाळा वेळेवर सुरू होतील की नाही, याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यात औरंगाबाद महापालिकेच्या शिक्षण विभागाचे अधिकारीही सहभागी झाले होते. या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यात पहिल्या टप्प्यात ग्रीन झोनमधील शाळा सुरू होतील, असे सांगण्यात आले.
शाळा सुरू करताना वर्गातील विद्यार्थी संख्या कमी ठेवण्याच्या अनुषंगाने काही पर्यांयांचा विचार झाला. त्यात काही विद्यार्थी आज, तर काही विद्यार्थी दुसऱ्या दिवशी, अशा रोटेशन पद्धतीने शाळा भरविणे किंवा वीस-वीस विद्यार्थ्यांच्या तुकड्या करून एका बाकावर एकच विद्यार्थी बसविणे, असे पर्याय सुचविण्यात आले. रेड झोनमधील शाळा दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. त्या अनुषंगाने तूर्तास शाळा सॅनिटाईज करून घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यंदाही मोफत पुस्तकांचे वाटप
राज्यात सरकारी आणि अनुदानित खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरविली जातात. यंदाही हे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ग्रीन झोनमधील शाळांना आधी पुस्तके पुरविण्यात येणार आहेत. मंगळवारपासून डेपोतून जिल्हास्तरावर, नंतर केंद्रस्तरावर आणि तेथून पुढे शाळांना ही पुस्तके पुरविली जाणार असल्याचे मनपाच्या सूत्रांनी सांगितले.