Corona Virus : म्युकरमायकोसिसचा विळखा; मराठवाड्यात कोरोना न झालेल्यांनाही आजाराने घेरले, एकूण ७०१ रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 14:41 IST2021-05-26T14:37:49+5:302021-05-26T14:41:07+5:30
म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला अॅम्फोटेरेसिन बी आणि इम्लशनच्या इंजेक्शनचे किमान तीन डोस दिवसभरात लागतात.

Corona Virus : म्युकरमायकोसिसचा विळखा; मराठवाड्यात कोरोना न झालेल्यांनाही आजाराने घेरले, एकूण ७०१ रुग्णांची नोंद
औरंगाबाद : कोरोना या संसर्गजन्य आजारातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस तथा ब्लॅक फंगस (काळी बुरशी) या आजाराने घेरण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचा हळूहळू मराठवाड्यात विळखा घट्ट होऊ लागला असून, आजवर ७०१ रुग्णांची नोंद विभागात झाली आहे.
सर्वाधिक ३३७ रुग्ण मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोरोना न झालेल्या १०४ जणांनादेखील या आजाराने घेरले असून, हे सर्व रुग्ण नांदेड जिल्ह्यातील आहेत, तर उर्वरित ५९७ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना हा आजार झाला आहे.
विभागीय प्रशासनाने म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी काम करीत आहेत. आजारांच्या लक्षणांपासून उपचार पद्धती, औषधी या बाबींची माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ३८३ रुग्ण खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ३२ सरकारी, तर १८२ रुग्ण जीएमसीमध्ये आहेत. खाजगी हॉस्पिटल्समध्ये सर्वाधिक रुग्ण अॅडमिट आहेत.
नांदेड जिल्ह्यात १०४ नॉनकोविड रुग्ण
नांदेड जिल्ह्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये १८, तर जीएमसीमध्ये ८६ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे रुग्ण नॉनकोविड आहेत. त्यांना कोरोना झालेला नव्हता. मात्र, ते म्युकरमायकोसिसच्या आजाराच्या विळख्यात आले.
२१०३ इंजेक्शनची रोज मागणी
म्युकरमायकोसिस झालेल्या एका रुग्णाला अॅम्फोटेरेसिन बी आणि इम्लशनच्या इंजेक्शनचे किमान तीन डोस दिवसभरात लागतात. सध्या विभागात असलेल्या रुग्णांना रोज २१०३ इंजेक्शनची गरज आहे. मात्र, ५०० च्या आसपास इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात अनेक अडचणी येत आहेत. इंजेक्शनच्या १०० ते २०० व्हायल्स औरंगाबादेत येत आहेत. उर्वरित जिल्ह्यात कमी-अधिक पुरवठा होतो आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे रुग्ण, नातेवाईक या इंजेक्शनसाठी प्रचंड धावपळ करीत आहेत.
कोरोनानंतर म्युकरमायकोसिस झालेले रुग्ण
औरंगाबाद ३३७
जालना ३६
बीड ६९
लातूर ८१
परभणी ४
हिंगोली १२
नांदेड ५१
उस्मानाबाद ७
एकूण ५९७ १०४= ७०१