corona virus : सुटीच्या दिवशीही दिसला शिक्षण विभाग कोरोना सर्वेक्षणात व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 12:15 IST2021-05-03T12:12:47+5:302021-05-03T12:15:37+5:30
'आज मी कोठे व्हाॅट्सॲप' ग्रुपवर जीओटॅग फोटोसह माहिती देणे केले बंधनकारक

corona virus : सुटीच्या दिवशीही दिसला शिक्षण विभाग कोरोना सर्वेक्षणात व्यस्त
औरंगाबाद- ग्रामीणमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढतच आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने कोरोनाला थोपवण्यासाठी कंबर कसली असून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसह सुमारे सहा हजार शिक्षक सुटीच्या दिवशीही सर्वेक्षणात व्यस्त आहेत. महाराष्ट्र दिन, रविवारी सुटी असतानासुद्धा शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आज मी कोठे या ग्रुपवर सर्वेक्षणाचा ग्राऊंड रिपोर्ट अध्यक्ष, सीईओंना थेट कळवत होते.
लाडसावंगीच्या दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांना जिल्ह्यात होणारे सर्वेक्षण अपेक्षेप्रमाणे गांभीर्याने होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर २५ एप्रिलला शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांची व्हिडीओ काॅन्फरन्सिंग घेतली. त्यात अध्यक्षा शेळके यांनी लहानसहान त्रुटींवर बोट ठेवले. त्यानंतर ३० अधिकाऱ्यांचा व्हाॅट्सॲप ग्रुप बनवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार आज मी कोठे लोकेशनसह फोटो व भेटीदरम्यान केलेल्या कामाची संक्षिप्त माहीती देण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे सर्वेक्षणात अधिकाऱ्यांनी लक्ष घातले.
महाराष्ट्र दिनाच्या सुटीच्या दिवशीही सर्व अधिकारी क्षेत्रभेटीवर आढावा घेताना दिसून आले. त्यामुळे नियुक्त शिक्षकांकडून सर्वेक्षण करून त्यातून आढळलेल्या संशयितांची यादी ग्रामदक्षता समितीकडे वर्ग व्हायला सुरुवात झाली. शनिवारी औरंगाबाद गटशिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बजाजनगर, फुलंब्रीचे गटशिक्षणाधिकारी अशोक पाटील फुलंब्री शहरात, विस्तार अधिकारी रमेश ठाकुर यांनी घारेगाव पिंप्री, एकतुनी यांच्यासह विलगीकरणातील अधिकारी कर्मचारी सोडून सुमारे सहा हजार शिक्षक, अधिकारी सुटीच्या दिवशीही सर्वेक्षण कार्यात होते.
माझा जिल्हा माझी जबाबदारीचा संकल्प
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ संकल्पना विस्तारित करून माझा जिल्हा माझी जबाबदारी असा संकल्प विभागाने केला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. सुटीच्या दिवशीही अधिकाऱ्यांसह सर्व सर्वेक्षणासाठी नेमलेल्या शिक्षकांकडून सर्वेक्षण गांभीर्याने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पूर्वी असहकार्य, आता गंभीरतेने सर्वेक्षण
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत केलेल्या दाैऱ्यात गावातून सरपंच, जिल्हा परिषद सदस्यांच्या आरोग्य विभागाला शिक्षण विभागाचे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तातडीने बैठक घेवून शिक्षण विभागाला परिस्थिती सांगितली. सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षण विभागाकडून गांभीर्याने होणारे सर्वेक्षण आता कोरोना प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरतेय, असे जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांनी सांगितले.