Corona Virus : महापालिकेचा अँटिजन टेस्टसाठी तब्बल १४ कोटींचा खर्च !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 12:58 IST2021-06-12T12:54:39+5:302021-06-12T12:58:39+5:30
सुरुवातीला प्रयोगशाळांची संख्या कमी होती. त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटांत तपासणी करणाऱ्या अँटिजन किटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

Corona Virus : महापालिकेचा अँटिजन टेस्टसाठी तब्बल १४ कोटींचा खर्च !
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आजपर्यंत कोरोना तपासणीसाठी सहा लाख ५९ हजार १५० अँटिजन किटचा वापर करण्यात आला. त्यासाठी महापालिकेने शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून तब्बल १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महापालिकेकडे सध्या ४७ हजार ७५० किट शिल्लक आहेत. दररोज तीन ते चार हजार नागरिकांची तपासणी सुरूच आहे. तपासणीचा हा वेग लक्षात घेता प्रशासनाला आणखी किट खरेदी कराव्या लागणार आहेत.
कोरोनाचा संसर्ग मागीलवर्षी मार्च महिन्यात सुरू झाला होता. आरटीपीसीआर, अँटिजन पद्धतीने टेस्ट करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सुरुवातीला प्रयोगशाळांची संख्या कमी होती. त्यामुळे पंधरा ते वीस मिनिटांत तपासणी करणाऱ्या अँटिजन किटला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. देशभरातील वेगवेगळ्या कंपन्यांनी किटचे दर वाढवून ठेवले. महापालिकेने प्रारंभीच्या काळात पाचशे रुपये देऊन एक किट खरेदी केली. दोन ते तीन महिन्यांपूर्वी किट अवघ्या पंचावन्न रुपयांत घेण्यात आली. आता पुन्हा कंपन्यांनी दर वाढविले आहेत. ८९ रुपयांमध्ये एक किट विकण्यात येत आहे. केंद्र शासनाने आजपर्यंत किट विकणाऱ्या कंपन्यांवर अंकुश लावण्यात यश आलेला नाही. मनमानी पद्धतीने कंपन्या दर आकारात आहेत. या नवीन दरानुसार महापालिकेला यापुढे किट खरेदी कराव्या लागणार आहेत.
महापालिकेने मागील पंधरा महिन्यांत सात लाख सहा हजार ९९ किट खरेदी केल्या. जवळपास १४ कोटी रुपये किट खरेदीसाठी विविध कंपन्यांना देण्यात आले. महापालिकेने खरेदी केलेल्या किटमधून तीन लाख चार हजार १०० किट विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या. महापालिकेने नियुक्त केलेले मोबाइल पथक, कोविड केअर सेंटर, आरोग्य केंद्र यांना देण्यात आल्या. सहा लाख ५९ हजार १५० किट वापरण्यात आल्या आहेत.
अशा पद्धतीने खर्च केल्या किट :
७,६,९०० किट खरेदी
२७,०२५ किट कोविड केअर सेंटरला दिल्या
५०० किट खराब निघाल्या
३०,३०० किट आरोग्य केंद्रांना दिल्या
३,९६,१७५ किट मोबाइल मीला दिल्या
२,४,१०० किट शासकीय, खासगी रुग्णालयांना दिल्या
६,५९,१५० किटचा वापर
४७,७५० किट शिल्लक