औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लाॅकडाऊनचा आंतरजातीय विवाहांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 18:11 IST2020-11-21T18:10:08+5:302020-11-21T18:11:26+5:30
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत असले तरी अजूनही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसून येत नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लाॅकडाऊनचा आंतरजातीय विवाहांना फटका
- योगेश पायघन
औरंगाबाद : आंतरजातीय विवाहांची संख्या तुलनेत दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, लाॅकडाऊनचा फटका या विवाहांनाही बसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या वर्षात नोंदणी पद्धतीने २४६ विवाह पार पडले. त्यापैकी केवळ ९ जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला असून, हे प्रमाण ३.६५ टक्के इतके आहे.
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत असले तरी अजूनही याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसून येत नाही. या विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातून ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य प्रोत्साहन म्हणून दिले जाते. दरवर्षी या योजनेच्या लाभार्थींचा आलेख वाढता दिसतोय. मात्र, यंदा लाॅकडाऊनमुळे केवळ ९ प्रस्तावच दाखल झाल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी शिवप्रसाद केंद्रे यांनी दिली.
आर्थिक साहाय्य मिळत नसल्याने योजनेला खीळ
२०१९ मध्ये नोंदणी पद्धतीने झालेल्या विवाहांचा आकडा २०१८ पेक्षा अधिक होता. ४९५ विवाह नोंदणी पद्धतीने लागले होते. त्यापैकी ७८ विवाह आंतरजातीय होते. त्याचे प्रमाण १५.७५ टक्के झाले होते. त्या जोडप्यांना जि. प.कडून प्रोत्साहन योजनेतून ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही केली होती. यावर्षी ९ प्रस्ताव दाखल झाले होते. ते वित्त विभागाकडे पाठविल्याचे केंद्रे म्हणाले.
याेजनेचा लाभ कोणाला?
दिव्यांग व दिव्यांग नसलेल्या जोडप्यांच्या लग्नालाही प्रोत्साहन दिले जाते. मात्र, अनेकांना या योजनांबद्दल माहिती नसते. किंवा त्यांना मदत नको असते. अशा नोंदी होत नाही; पण या योजनेचा प्रसार समाजात झाल्यास योजनेचा मूळ उद्देश यशस्वी होईल, असेही ते म्हणाले, तर दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी विवाहात जाती-धर्माचे वर्गीकरण केले जात नसल्याचे सांगण्यात आले.