औरंगाबादची शांतता भंग करण्यासाठी बनवला वादग्रस्त व्हिडिओ; तरुणावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 13:44 IST2022-05-21T13:44:06+5:302022-05-21T13:44:35+5:30
व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनेची शहानिशा केली तेव्हा अशी घटना घडलीच नसल्याचे तपासात समोर आले.

औरंगाबादची शांतता भंग करण्यासाठी बनवला वादग्रस्त व्हिडिओ; तरुणावर गुन्हा दाखल
औरंगाबाद : शहराच्या शांततेला गालबोट लागावे, या उद्देशाने व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी भंडाफोड केला. त्या भामट्याविरुद्ध अखेर सिडको पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा नोंदविला.
आलमगीर कॉलनीतील रहिवासी इम्रान खान रज्जाक खान यास २८ एप्रिलला रात्री साडेअकरा वाजता जळगाव रोडवरील शरद टी पॉइंट येथे अकबर लंगडा (रा. हर्सूल), सद्दाम आणि अन्य एका अनोळखीने मारहाण करून त्याच्या खिशातील १ हजार ७०० रुपये हिसकावून घेतले होते. या घटनेनंतर तो सिडको पोलीस ठाण्यात गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठविले. तेथे गेल्यानंतर त्याने मोबाइलवर व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमावर व्हायरल केला. या व्हिडिओ क्लीपमध्ये इम्रानने सांगितले की, शरद टी पॉइंट येथे त्याला पंधरा जणांनी तलवारीने मारले. जय श्रीराम म्हणत सिडको बसस्थानकापासून त्यांनी पाठलाग केला. या व्हिडिओची गंभीर दखल घेत पोलिसांनी घटनेची शहानिशा केली तेव्हा अशी घटना घडलीच नसल्याचे तपासात समोर आले.
...म्हणून बनवला खोटा व्हिडिओ!
त्याच दिवशी पडेगाव येथेही मारहाणीची घटना घडली होती. त्यातील जखमी तरुणांना उपचारासाठी घाटीत आणले असता मोठा जमाव जमला होता. याचवेळी इम्रानही घाटीत उपाचारासाठी दाखल झाला होता. जमावातील चर्चा ऐकून कोणी तरी त्याला ‘जय श्रीराम’ म्हणायला लावून मारहाण झाल्याचा व्हिडिओ तयार करण्याचे सांगितले. त्यानुसार त्याने तसा व्हिडिओ तयार केल्याचे कबूल केले.