दोन मिनिटांचा राग आवरा, सकारात्मक जगायला शिका, कष्ट करा, यश हमखास मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 20:00 IST2025-11-21T19:59:13+5:302025-11-21T20:00:27+5:30
आज हसणंच हरपून गेल्याची केली खंत व्यक्त; उत्तरोत्तर कीर्तन रंगतच गेले

दोन मिनिटांचा राग आवरा, सकारात्मक जगायला शिका, कष्ट करा, यश हमखास मिळेल!
छत्रपती संभाजीनगर : ‘दोन मिनिटांचा राग आवरा, सकारात्मक जगायला शिका, कष्ट करा, यश येईलच,’ असा हितोपदेश प्रख्यात कीर्तनकार व प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांनी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ व राज्याचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला कीर्तनात केला.
हसून-हसून पुरेवाट...
सिडको एन-५ येथील राजीव गांधी स्टेडियमवर हे कीर्तन गुरुवारी रात्री उत्तरोत्तर रंगतच गेले. महाराजांंनी ठेवलेलं व्यंगावरचं बोट, मर्मावर घातलेले घाव आणि त्यातून त्यांनी उडवलेले हास्याचे फवारे हे सारे अफलातूनच. त्यांचा एक-एक शब्द मनाला भिडणारा... पण त्यातील विनोदनिर्मितीतून उपस्थितांची झालेली हसवणूकही अविस्मरणीय. युवक व लहान मुलांशी त्यांनी लीलया संवाद साधला. प्रश्नोत्तरांतूनही विनोद, मनोरंजन व प्रभावी प्रबोधनही केले.
२७ वर्षांपूर्वीच्या कीर्तनाची आठवण....
याच राजीव गांधी स्टेडियमवरून २७ वर्षांपूर्वी राजेंद्र दर्डा यांच्या अभीष्टचिंतनाचे कीर्तन केले होते. आज पुन्हा याच ठिकाणी आलो, याची आठवण त्यांनी करून दिली. ‘आज सर्वांत स्वस्त महाराज मी आहे. माझ्या मागून येऊन काहीजण महाग झाले,’ असे सांगत, ‘मी कीर्तनासाठी कुणाकडूनही आधी पैसे घेतले नाहीत, घेत नाही, दाखवून द्यावे,’ असे आव्हानच त्यांनी दिले. ‘पाच हजार रु. मानधन घेऊन मी कीर्तन केलेले आहे. उगाचच माझ्याबद्दल अपप्रचार केला जातो. खरं बोलतो म्हणून मी गोत्यात येतो,’ अशी खंत महाराजांंनी यावेळी व्यक्त केली. स्वत: राजेंद्र दर्डा व राज्याचे दुग्धविकास, ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे संपूर्ण कीर्तनभर उपस्थित होते, हे विशेष.
.... तर चांगला बदल होईल
मोबाइलमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे, यावर महाराजांनी बोट ठेवले. शाळेत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शिक्षक़ांचे व विद्यार्थ्यांचे मोबाइल बंदच राहिले पाहिजेत. पहा कसा चांगला बदल होईल, अशी सूचना त्यांनी केली. तीन खोल्या कशासाठी बांधायच्या हे सांगताना महाराजांनी खूप हसवले. ताकद जपून वापरा व काळाला घाबरा, असे ते म्हणाले.
प्रारंभी इंदोरीकर महाराजांचे स्वागत राजेंद्र दर्डा यांनी केले; तर, राजेंद्र दर्डा यांना भलामोठा पुष्पहार अर्पण करून इंदोरीकर महाराजांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. सायली डिडोरे यांनी औक्षण केले. संयोजक बबन डिडोरे, विशाल डिडोरे व वंश डिडोरे यांचे महाराजांनी स्वागत केले. इंदोरीकर महाराजांच्या आधी ह.भ.प. प्रभाकर कुटे महाराजांनी भारुडे सादर करून मनोरंजन व प्रबोधन केले. पंकज फुलपगर, सनी घोडेले, गणेश नावंदर, आदींचीही यावेळी उपस्थिती होती. रमेश दिसागज यांनी सूत्रसंचालन केले. कीर्तनाला स्त्री-पुरुषांची मोठी गर्दी होती.