कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले २१ कोटी रुपये; सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:53 IST2024-12-23T06:53:03+5:302024-12-23T06:53:22+5:30

छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुलातील प्रकार

Contractual employees looted Rs 21 crore Incident at Chhatrapati Sambhajinagar sports complex | कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले २१ कोटी रुपये; सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळती

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले २१ कोटी रुपये; सरकारी निधी स्वतःच्या खात्यात केला वळती

छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बँक खात्यातील २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्यांत वळते करून हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. आरोपींमध्ये हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी व तिचा नवरा बी. के. जीवन यांचा समावेश आहे. क्रीडा अधिकारी तेजस कलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार, क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. विभागीय क्रीडा संकुलात दिशा फॅसिलिटीज कंपनीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची फेब्रुवारी २०२२ मध्ये निवड केली होती. त्यात आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांची निवड केली. त्यानंतर २०२३ मध्ये वेब मल्टिसर्व्हिसेसमार्फत क्षीरसागर व यशोदा शेट्टी यांची लेखा लिपिक म्हणून नियुक्ती झाली होती.

असा केला घोटाळा 

क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव व स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. त्यानुसार नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. 

कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करीत असताना क्रीडा उपसंचालक, बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले, असा प्रश्न आहे. आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

खात्यात आले ५९ कोटी

क्षीरसागर, शेट्टी कॅशबुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेशी पत्रव्यवहार करत होते. खात्यात २०२३ पासून ५९ कोटी ७ लाख ८२ हजार रुपयांचा निधी आला. त्यातील कोट्यवधी रुपये वळती करण्यात आले.

ईमेलची अदलाबदल अन् केला झोल

आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने लेखापरीक्षण करण्यासाठी बँक स्टेटमेंट मागविले. ते अधिकृत मेलवर न मागवता त्यात बदल करून दुसऱ्याच मेलवर मागविले. त्यात बदल करून लेखापरीक्षण करून घेतले. त्यात २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपये एवढी रक्कम हडपल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

२१ कोटी स्वतःच्या खात्यात अन् नंतर... 

क्षीरसागरने १ जुलै ते ७ डिसेंबरदरम्यान २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रु. स्वतःच्या खात्यात वळते केले होते. त्या खात्यातून त्याने इतर बँकांच्या खात्यांत पैसे पाठविले. त्यात यशोदा शेट्टीच्या खात्यात अडीच लाख, तर तिच्या नवऱ्याच्या खात्यात १ कोटी ६९ लाख ५० हजार रुपये पाठविल्याचे सापडले.

विभागीय क्रीडासंकुलाच्या बँक खात्याचा व्यवहार फक्त धनादेशाद्वारेच होतो. कॅशबुकवर शिल्लक रकमेच्या नोंदी योग्य आहेत. मात्र, ऑनलाइन पद्धतीने खात्यातील पैसे वळते होत असताना मोबाइल नंबर बदलल्यामुळे उघडकीस आले नाही. बँक खात्याचे संपूर्ण स्टेटमेंट पाहिले, तेव्हा हे उघडकीस आले. - संजय सबनीस, उपसंचालक, क्रीडा विभाग.
 

Web Title: Contractual employees looted Rs 21 crore Incident at Chhatrapati Sambhajinagar sports complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.