कन्नडमध्ये सावकारी जाचामुळे ठेकेदाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 18:41 IST2019-01-16T18:19:48+5:302019-01-16T18:41:18+5:30
यावेळी खोलीतील टेबलवर पोलीसांना सुसाइड नोट आढळून आली.

कन्नडमध्ये सावकारी जाचामुळे ठेकेदाराची आत्महत्या
कन्नड (औरंगाबाद ) : सावकारांच्या त्रासाला कंटाळून एका ठेकेदाराने लॉजमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. भाऊसाहेब काशिनाथ घुगे (५०) असे मृताचे नाव असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका लॉजमधील खोलीत भाऊसाहेब काशिनाथ घुगे (रा.मेहेगाव ता.कन्नड ह.मु.औरंगाबाद ) यांनी आज सकाळी ८ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच सपोनि.बालाजी वैद्य, पोउपनि.सुनिल पवार, पोना.प्रविण बरडे आदींनी घटनास्थळ गाठले.
यावेळी खोलीतील टेबलवर पोलीसांना सुसाइड नोट आढळून आली. यात विष्णु किसन कळागते रा.केडगाव जि.अहमदनगर, अशोक भाऊसाहेब पानकडे रा.गंगापुर, सुभाष रामगोपाल भारुका व संदेश सुभाष भारुका दोघेही रा.कन्नड हे पैशासाठी त्रास देत असुन पैसे न दिल्यास जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने सावकारीस कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आढळून आला. यानंतर मृताचा भाऊ सुरेश घुगे याच्या फिर्यादीवरुन चारही आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.