गटई कामगारांचे साहित्य धूळ खात
By Admin | Updated: February 8, 2015 00:09 IST2015-02-07T23:58:04+5:302015-02-08T00:09:54+5:30
जिल्ह्यातील गटई कामगारांसाठी सामाजिक व न्याय विभाग आणि संत रविदास महामंडळातर्फे ढोर, मोची चर्मकार आदी समाजातील व्यक्तींना देण्यात येणारे पत्र्याचे

गटई कामगारांचे साहित्य धूळ खात
गजानन वानखडे , जालना
जिल्ह्यातील गटई कामगारांसाठी सामाजिक व न्याय विभाग आणि संत रविदास महामंडळातर्फे ढोर, मोची चर्मकार आदी समाजातील व्यक्तींना देण्यात येणारे पत्र्याचे स्टॉल धूळ खात पडून असल्याने अनेक लाभार्थी या पासून वंचित आहेत.
या समाजातील अनेक व्यक्ती चमड्यापासून पादत्राणे तयार व दुरूस्ती करण्याचे कामे करतात. रस्त्यांच्या कडेला बसून ऊन, पावसात आपला उदरनिर्वाह चालवतात.
त्यांना ऊन, वारा, पावसापासून सरंक्षण मिळावे आणि त्यांचे साहित्यही सुरक्षित राहावे, समाजाची उन्नती व्हावी या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने १०० टक्के शासकीय अनुदानावर महापालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र, ग्रामपंचायत क्षेत्रात स्टॉल देण्याची शासनाची योजना आहे. परंतु २०११ -१२ यावर्षातल्या ६० लाभार्थी, आणि२०१३ -१४ चे २३० लाभार्थीं अशा २९० लाभार्थ्यांना पत्र्याचे टॉल मिळाले नाहीत.
सन २००८ -९ या वर्षात शासनाकडून जिल्हातील ४१२ लाभार्थ्यांसाठी आलेल्या ४१२ स्टॉलपैकी अद्यापही ४१ स्टॉल वाटपाविना सामाजिक न्याय विभागाच्या गोदामात धुळखात पडून आहेत.
या साहित्याचे संबंधित लाभार्थ्यांना तातडीने वितरण व्हावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.
सन २०१२ - १३ व २०१३ -१४ या वर्षाच्या लाभार्थ्यांना टपरी स्टॉल मिळावे यासाठी आपल्या कार्यालयाने वारंवार शासनाकडे, तसेच संत रोहिदास महामंडळाकडे पत्रव्यववहार केला. त्यासाठी काही वेळा मी स्वत: मुंबईला जाऊन प्रलंबित कामासाठी चकरा मारल्या. पंरतु अद्यापही या वर्षाचे साहित्य मिळाले नाही. लाभार्थी यापासून वंचित आहेत. २०१२ -१३ वर्षाचे १२२ लाभार्थ्यांसाठी १२२ टपरी स्टॉल ३० जानेवारी रोजी सामाजिक न्याय विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्यांचे काम सुरू आहे. तात्काळ लाभार्थ्यांना साहित्य मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. कामपूर्ण होताच लाभार्थ्यांना तात्काळ स्टॉलचे वाटप करण्यात येईल.
बी.एन.वीर, सहाय्यक समाजकल्याण आयुक्त, जालना